दि. 11.05.2023
MEDIA VNI
सुरजागड प्रकल्प पुढे करून सरकारने दाखवलेलं गोड स्वप्न कडू झालं, पाहा काय आहे आजची स्थिती..!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/एटापल्ली : सुरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. कंपनी आणि प्रसाशानाने स्थानिकांना रोजगार मिळणार, असे दावे केले होते. रोजगार तर मिळाला नाही उलट मिळाली मरणवाट. लोहखनिजाची मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूकीमुळे या मार्गांवरील प्रवास जिकरीचा ठरला आहे.
कधी हिरवागार दिसणारा निसर्ग धुळीने लाल भडक झाला आहे. ही धूळ येथील मानवी आरोग्याला प्रभावित करीत असून श्वसनाचा आजार आता उद्भवू लागले आहेत. सुरजागडाला धरून स्थानिकांना विकासाचे गोड स्वप्न दिसू लागले होते. मात्र वर्षभरातच ही स्वप्ने कडवट झाल्याचे चित्र आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननाला सुरुवातीपासूनच विरोध होता. स्थानिकांचा विरोध डावलून उत्खनन सुरू आहे. सुरजागड टेकडीवरील उत्खननामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल असं सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात रोजगार निर्मिती झाली नाही. सुरजागडाकडे जाणाऱ्या मार्गासाठी नैसर्गिक जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली. तर उत्खननासाठी सुरजागड टेकडीवरील लाखो वृक्ष भुईसपाट केल्या गेली. यामुळे टेकडीवरील जैवविविधता नष्ट झाली. दुसरीकडे चोवीस तास सुरु असलेल्या अवजड वाहतूकीमुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. सतत सुरू असलेल्या वाहतुकीने आष्टी-एटापल्ली मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत. जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करावा लागतो. उत्खनन सुरू व्हायच्या पूर्वी या मार्गाच्या दुतर्फा दिसणारी हिरवीगार वृक्ष सुरजागड येथून होणाऱ्या वाहतुकीमुळे लाल भडक झाली आहे. या खाणीतून आजतागायत हजारो कोटींचे खनिज बाहेर नेण्यात आले. अवजड वाहनांमुळे परिसरातील जवळपास 70 कि.मी.चा मार्गाची ऐसीतैसी झाली आहे. या मार्गावर कायम धुळीचे साम्राज्य असते. आलापल्ली, लगाम, बोरी, आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावातील नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवू लागले आहेत. अनेकांना दमा, फुफुसाचा आजार झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अवजड वाहतुकीचा फटका शेतीला बसला आहे. धुळीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली. मात्र त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही. दिवस-रात्र सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. सुरजागडला समोर करून स्थानिकांना विकासाचे गोड स्वप्न दाखवण्यात आलं. मात्र वर्षभरातच हे गोड स्वप्न कारल्यासारखं कडू झाला आहे. त्यामुळे आत्ता स्थानिक पातळीवरूनही सुरजागडाला विरोध होताना दिसत आहे.