दि. 12 ऑक्टोंबर 2023
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे थाटात उद्घाटन
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हावे : - प्रकाश महाराज वाघ
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १६५ ग्रंथांची साहित्य सपंदा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या साहित्याचे वाचन हे प्रत्येकाने करायला हवे. शिक्षकांनी आपल्या कडील ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी ओतून टाकावे.स्वतःच्या चांगल्या कर्माने स्वतःची ओळख तयार करावी.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
त्यांचे विचार प्रत्येक पिढी साठी कसे महत्त्वाचे आहे याबाबत त्यांनी त्यांच्या जीवन कार्याच्या अनेक पैलूवर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हावे असे प्रतिपादन उदघाटक तथा मार्गदर्शक वर्धा येथील प्रकाश महाराज वाघ यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे
कुलगुरु, डॉ. प्रशांत बोकारे,
उद्घाटक तथा मार्गदर्शक
वर्धा येथील अभ्यासक तथा प्रमुख वक्ते, प्रकाश महाराज वाघ प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, रवी भुसारी,अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दनपंथ बोथे, गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महारांजाचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारावे : कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन करून इथेच न थांबता या उद्घाटनापासूनच आता खरं कार्य सुरू झालेलेआहे. तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा येथील लोकांवर आहे. महाराजांचे हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील. त्यांच्या विचाराने येणाऱ्या पिढीला कशी वाट दाखवता येईल. जग डिजिटल क्रांती कडे चालले आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकरावे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. शिवनाथ कुंभारे, रवी भुसारी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक या केंद्राचे समनव्यक सा. प्रा. डॉ.विनायक शिंदे यांनी,
संचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. निळकंठ नरवाडे यांनी तर आभार सहाय्यक प्राध्यापक हेमराज निखाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यापूर्वी गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र, पंडित दीनदयाल उपाध्याय अध्यासन केंद्र, आदिवासी अध्यासन केंद्र सुरू झाले आहे. सदर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून महान व्यक्तींच्या कार्य व विचारांचा अभ्यास करण्यात येणार आहे. विद्यापीठात एकूण पाच अध्यासन केंद्र मंजूर झाले आहे.