दि. 07 मे 2025
मध्यरात्री पाकिस्तानात घुसले,23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल जाणून घ्या..
मीडिया वी.एन.आय :
Operation Sindoor : भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला.
मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर
'ऑपरेशन सिंदूर'ची वैशिष्ट्ये-
1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
5. ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले
राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र-
1. पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर
2. राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र
3. अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र
4. 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता
5. 1 हजार किमी प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल करतं मारा
6. शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्याने हल्ला यशस्वी
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरची एक-एक गोष्ट सांगितली-
पाकिस्तानात 100 किमी आत घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला, अशी माहिती भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरनंतर दिली. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा पुराव्यांसह बुरखा फाडला. लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती देताना सांगितलं की, भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.
ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं?
संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25 आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईळ. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.
पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'-
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तथापि, हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॉनिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.
ऑपरेशन सिंदूरनं मसूद अजहर कुटुंब बेचिराख-
ऑपरेशन सिंदूरच्या या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला. इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत झालेल्या 26/ 11 च्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर (Masood Azhar) असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मसूद अजहरचा अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.
सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केले बेचिराख-
बहावलपूरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी
मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी
मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी
कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी
सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी
गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी
भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी
चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी
ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भरतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. या दहशवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं. सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे. या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानकडून बदला घेण्याच्या वल्गना-
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terrorist Attack) भारताने दिलेला प्रतिसाद 'तात्पुरता आनंद' असल्याची प्रतिक्रिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यात ते पुढे म्हणाले की 'याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल.'ISPR च्या अधिकृत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, 'पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल' आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला 'अनुत्तरीत सोडले जाणार नाही'.'भारताने तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद... पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत. सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत,' असे आयएसपीआरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे. 'पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी त्याचे उत्तर देईल. ते अनुत्तरीत राहणार नाही. भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा सततच्या दुःखाने घेतली जाईल,' असे त्यात म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार-
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच सीमेपलीकडून गोळीबार झाला. या गोळीबारमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.
ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईपूर्वी 15 दिवसांत काय घडले?
22 एप्रिल 2025: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि अनेकांचा जीव घेतला. हल्लेखोरांनी पर्यटकांना धार्मिक ओळख विचारून गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जण ठार झाले तर 17 जखमी झाले. भारताने या हल्ल्यासाठी ताबडतोब पाकिस्तानला जबाबदार धरले आणि पाकिस्तानी दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा आरोप केला.
23 एप्रिल 2025: भारताचा जलद प्रतिसाद- राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) तपास सुरू केला आणि गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, NIA ने पहलगाम हल्ल्याचा तपास हाती घेतला. हल्ल्याचा कट उलगडण्यासाठी एनआयए पथके बैसरन खोऱ्यात तैनात करण्यात आली आणि त्यांनी तपास सुरू केला.
सिंधू पाणी करार निलंबित- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) बैठकीत 1960 चा सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील. भारताने पहिल्यांदाच हा करार रद्द केला, ज्याला पाकिस्तानने 'Act of War' म्हणून वर्णन केले.
अटारी-वाघा सीमा बंद- भारताने पंजाबमधील अटारी-वाघा सीमा तपासणी नाका बंद केला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि हालचाल पूर्णपणे ठप्प झाली.
पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई- भारताने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा (सार्क, वैद्यकीय, इ.) तात्काळ प्रभावाने रद्द केले आणि पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले गेले, ज्याला पुढील आदेशापर्यंत वाढीव मुदत दिली गेली.
राजनैतिक पाऊल- भारताने इस्लामाबादमधील भारतीय मिशन आणि नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी केली. पाकिस्तान उच्चायोगातील संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आले आणि एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश दिले गेले.
24-27 एप्रिल 2025: वाढता तणाव आणि राजनैतिक हालचाली- सिंधू जल संधी कराराला स्थगिती दिल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. पाकिस्तानी सैन्याने बारामुल्ला, कुपवाडा, पूंछ आणि अखनूर सारख्या भागात नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार सुरू केला, ज्याला भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हटले. भारतीय लष्कराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
पर्यटन स्थळांवरील निर्बंध- जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली तर, बैसरण खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.
28-30 एप्रिल 2025: भारताची कडक भूमिका- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा आढावा बैठकीत सशस्त्र दलांना 'पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य' दिले आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ, लक्ष्य आणि पद्धत ठरवण्याचे अधिकार सैन्यावर सोपवले.
FATF मध्ये कारवाई- भारताने पाकिस्तानला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) मध्ये पुन्हा 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. तांत्रिक गुप्तचर सूत्रांच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्ल्यात टीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबाची भूमिका दर्शविणारे पुरावे सादर केले. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या 20 हून अधिक FATF सदस्य देशांनी भारताला पाठिंबा दिला.
1 मे 2025: भारतीय हवाई क्षेत्र बंद- भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले. यासोबतच पाकिस्तानहून येणाऱ्या सर्व टपाल आणि पार्सल सेवा (हवाई आणि जमीन) तात्काळ बंद करण्यात आल्या
2-6 मे 2025: जागतिक मध्यस्थी आणि तणाव- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत-पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधला आणि दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचे आवाहन केले.
7 मे 2025: ऑपरेशन सिंदूर-'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने PoK मधील मुरीदके, कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूर अशा नऊ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले. यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि TRF च्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अमेरिकेने काय म्हटले?
भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह त्यांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची प्रतिक्रिया-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलं आहे.
Entered Pakistan in the middle of the night, lost the game in 23 minutes; Know about India's 'Operation Sindoor'..
#MediaVNI #India #National #international #Pakistan #strike