इंदिरा गांधींना १९८० मध्ये कांद्यांच्या माळेने कसं जिंकवलं? 'ओनियन इलेक्शन'चा किस्सा काय? - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

इंदिरा गांधींना १९८० मध्ये कांद्यांच्या माळेने कसं जिंकवलं? 'ओनियन इलेक्शन'चा किस्सा काय?

दि. 31.10.2023 

MEDIA VNI 

इंदिरा गांधींना १९८० मध्ये कांद्यांच्या माळेने कसं जिंकवलं? 'ओनियन इलेक्शन'चा किस्सा काय?

मीडिया वी.एन.आय : 

दिल्ली : भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या धडाडीच्या निर्णयांसाठी ओळखलं जातं. त्यांना ‘आयर्न लेडी’ असंही म्हटलं जातं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

मात्र ‘आणीबाणी’च्या निर्णयामुळे त्यांचं सरकार गेलं होतं. तर ‘ऑपरेशन ब्लू स्टार’नंतर आजच्याच दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूला ३९ वर्षे उलटली आहेत. तरीही त्यांच्या आणीबाणीच्या निर्णयावरुन भाजपा अजूनही त्यांच्यावर टीका करताना दिसते.

आणीबाणी लागू करण्याचे कारण काय?

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या शिफारसीनंतर देशात आणीबाणी लागू केली. या निर्णयानंतर संपूर्ण देशभरात अस्थिरता निर्माण झाली होती. आणीबाणी लागू करण्याआधीच्या काही वर्षांत देशात वेगवेगळ्या घडामोडी घडल्या होत्या. चलनवाढ, अन्नधान्याची कमतरता हे प्रश्न आ वासून उभे होते. १९७२ मध्ये देशात भीषण दुष्काळ पडला होता. या काळात अमेरिकेसारख्या देशाने भारताची अन्नधान्याच्या बाबतीत अडवणूक केली होती. १९७३ सालात इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. १९७४-१९७५ या वर्षापर्यंत देशातील चलनवाढ २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. दुसरीकडे जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या नेत्यांनी इंदिरा गांधींविरोधी वातावरण निर्माण केले होते. देशभरात अनेक ठिकाणी कामगार-कर्मचाऱ्यांचे मोर्चे, निदर्शने होत होती. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिल्यामुळे या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. अशा अनेक कारणांमुळे इंदिरा गांधी यांनीआणीबाणी लागू केली होती, असे म्हटले जाते. आणीबाणीला भाजपाकडून अजूनही भारतीय राजकारणाचा काळा अध्याय असंच म्हटलं जातं.

देशात अस्थिर झालेले वातावरण आणि अंतर्गत सुरक्षेला धोका उद्भवू नये, यासाठी आणीबाणी लादली असल्याचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. (IndianExpress archive photo)

जनता पक्षाचं सरकार आलं

१९७७ मध्ये आणीबाणी उठवल्यानंतर मध्यावधी निवडणूक झाली. त्यात काँग्रेस पक्षाचा पाडाव झाला आणि जनता पक्षाचं सरकार आलं. या सरकारचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई. नंतर हे पद जुलै १९७९ मध्ये चरण सिंग यांना मिळालं. ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते. कारण जनता दलात तोपर्यंत बरीच फूट पडली होती. अंतर्गत बंडाळ्या, एकमेकांवरच्या कुरघोडीचं राजकारण यामुळे हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाही हे सांगितलं जात होतं आणि घडलही तसंच. १९८० म्हणजेच १९७७ नंतरच्या पुढच्या तीन वर्षातच देशात सार्वत्रिक निवडणुका लागल्या. या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा विजय कसा झाला? त्याचा किस्सा रंजक आहे.

१९८० आणि कांद्याचा तो रंजक किस्सा

१९८० च्या निवडणुकीच्या प्रचारात इंदिरा गांधी कांद्याची माळ घालून देशभरात प्रचार करत फिरल्या होत्या. कांद्याची मोठ्या प्रमाणावर दरवाढ त्या काळातल्या सरकारमध्ये झाली होती. सरकार कोसळल्यानंतर प्रचारात कांदा हा मुद्दा अत्यंत कळीचा झाला होता. त्या काळात इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सी. एम. स्टिफन हे देखील कांद्याची माळ घालून संसदेत पोहचले होते. इंदिरा गांधी यांनी कांदा हा निवडणुकीचा मुद्दा बनवला. प्रचारासाठी जाताना कांद्याची माळ घालून त्या प्रचार करायच्या. १९८० मध्ये इंदिरा गांधींना भरभरुन मतदान झालं. ज्यामुळे इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसल्या. इंदिरा गांधी यांच्या कांदा माळ प्रचाराची दखल पाश्चिमात्य माध्यमांनीही घेतली. इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर ‘युनियन इलेक्शन’ला ‘ओनियन इलेक्शन’ही म्हटलं गेलं. तसंच वॉशिंग्टन पोस्टने त्या काळात ‘कांद्यामुळे इंदिरा गांधी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधान झाल्या’ या आशयाचा एक मथळाही दिला होता. इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये सी. एम. स्टीफन यांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रिपद मिळालं.

इंदिरा गांधींच्या आधी पंतप्रधान असलेले चरण सिंग यांना कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. तसंच महागाईही खूप वाढली होती. इंदिरा गांधी यांनी नेमका तोच मुद्दा उचलून धरला आणि प्रचार केला. प्रचाराला जाण्याआधी त्या आवर्जून गळ्यात कांद्याची माळ घालत. त्यामुळे इंदिरा गांधी भरघोस बहुमताने निवडून आल्या.

इंदिरा गांधी आणि १९८० ची ती निवडणूक

इंदिरा गांधींच्या शासन काळातला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा निर्णय मात्र त्यांचं आयुष्य संपवणार ठरला. शीख समुदायाचं पवित्र स्थान असलेलं अमृतसरचं सुवर्ण मंदिर. या मंदिरात इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना ठार करण्यासाठी सैन्य घुसवलं होतं. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी इंदिरा गांधी यांच्याच अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सतवंत सिंग आणि बियांत सिंग या दोघांनी इंदिरा गांधींवर ३३ राऊंड फायर केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

३१ ऑक्टोबर १९८४ च्या दिवशी इंदिरा गांधींच्या मृत्यूची बातमी आली

३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी इंदिरा गांधी यांच्या मृत्यूची बातमी आली. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही बातमी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी इंदिरा गांधी यांचं पार्थिव दर्शनासाठी तीन मूर्ती हाऊस या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. दोन दिवस इंदिरा गांधी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. ‘इंदिरा गांधी अमर रहे’ या घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर ‘खून का बदला खून से लेंगे’ अशाही घोषणा दिल्या गेल्या. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘गांधींनंतरचा भारत’ या पुस्तकात हा उल्लेख केला आहे. गुहा पुढे म्हणतात, इंदिरा गांधींची हत्या झाल्याच्या दिवसापासून म्हणजेच ३१ ऑक्टोबर १९८४ पासून हिंसाचार उसळला. हा हिंसाचार २ नोव्हेंबरपर्यंत चालला होता. शीख समुदायाची घरं जाळण्यात आली, दुकानं लुटली. शीख समुदायांच्या प्रार्थना स्थळांवरही हल्ले झाले.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जो हिंसाचार उसळला होता त्यात एकट्या दिल्लीत १ हजाराहून जास्त लोक मारले गेले. हे सगळे शीख बांधव १८ ते ५० या वयोगटातले होते. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले होते त्यांना या हिंसाचाराविषयी विचारलं असता, “मोठा वृक्ष कोसळला तर आजूबाजूची जमीन हलणारच ना? “या आशयाचं उत्तर दिलं होतं. इंदिरा गांधी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सगळा देश हादरला होता.

How did Indira Gandhi win in 1980 with a garland of onions? What is the story of 'Onion Election'?

Share News

copylock

Post Top Advertisement

-->