दि. 4 सप्टेंबर 2024
गडचिरोली : उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू.!
- चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाल्याने गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता.वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची ४ सप्टेंबरला चित्रफित सार्वत्रिक होताच हळहळ व्यक्त होत आहे.
बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई- वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली. दोन्ही भावंडांच्या मृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोक अनावर झाला. मात्र, भाबड्या आशेपोटी दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते,त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. मजल- दरमजल करत ते चालत राहिले. त्यानंतर नातेवाईकाची दुचाकी बोलावून त्यावरुन ते पत्तीगावला पोहोचले.
दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मागविण्यात येईल.
- डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली)
Gadchiroli: Death of two little siblings who went to a priest instead of a doctor for treatment.
- 15 km walk of parents carrying dead bodies of small children on their shoulders. #गडचिरोली #Gadchiroli #MaharashtraNews #MediaVNI