दि. 8 ऑक्टोंबर 2023
MEDIA VNI
Article लेख : शिक्षक असा असावा...
मीडिया वी.एन.आय :
कोणत्याही देशाला समृद्ध करणारी व्यवस्था म्हणून शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले जाते. शिक्षण हे समाज व राष्ट्र विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे साधन मानले गेले आहे, मात्र हे सर्व साध्य होण्यासाठी शिक्षणाच्या प्रक्रियेत कार्यरत असणारे मनुष्यबळ अधिक महत्त्वाचे मानले जाते.
शिक्षण प्रक्रियेत मनुष्यबळ जितके समृद्ध असेल तितक्या मोठ्या प्रमाणात तेथे शिकणारे बालक समृद्ध होत असते. शिक्षकांच्या वर्गातील पेरणीवर उद्याचा नागरिक घडत असतो. त्यामुळे समृद्ध शिक्षकच उद्याचा समृद्ध भारत घडविणार आहेत. मुले पुस्तकांमधून फार काही शिकतात असे नाही आणि त्यांच्या पुढे फार सुविचार, सुवचने अथवा आदर्शाचे धडे कथन केले म्हणजे सुधारतातच असेही नाही. विद्यार्थ्यांसमोर सातत्याने असणारे शिक्षक ज्या कृती करतात त्या प्रत्येक कृतीचे विद्यार्थी निरीक्षण करतात. त्यामुळे आपले शिक्षक जे करतात तेच मुले करणे पसंत करतात. शिक्षकांच्या वर्तनाची मोठी छाप विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीवर पडते असे मानले जाते. त्यामुळे शिक्षक अधिक समृद्ध असायला हवेत अशी राज्यकर्ते आणि समाजाची अपेक्षा असते.
त्यामुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये शिक्षकांची निवड प्रक्रिया ही अधिक सूक्ष्म आणि कठीण स्वरूपाची असते. शिक्षक होणे तसे सहजपणे कोणाचेही काम नाही. शिक्षक होण्यासाठी पदविका, पदवी, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असले म्हणजे चांगला शिक्षक बनता येते का? उच्च श्रेणीतील गुण प्राप्त केलेले असतील तरच ते शिक्षक गुणवत्तेचे असतात असे काही आहे का? तर याचे उत्तर आपोआपच नाही असे येते. शिक्षक होण्यासाठी पात्रता ही केवळ औपचारिकता आहे, पण त्यापलीकडे शिक्षक म्हणून काही गुण व्यक्तीमध्ये असायला हवे असतात. जगप्रसिद्ध निसर्गवादी शिक्षणतज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचा मार्ग हा शिक्षकांना प्रकाशाची वाट दाखविणारा आहे. त्या वाटेने जाणारे शिक्षक उद्याचा समाज समृद्धतेने घडविल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चांगले शिक्षक हेच समृद्ध समाजाची निर्मिती करीत असतात. त्यांच्याशिवाय आपल्याला प्रगतीची पावले टाकता येणार नाहीत.
रवींद्रनाथ टागोर यांनी शांतीनिकेतनमध्ये शिक्षणासंबंधीचे अनेक प्रयोग केले. शिक्षणाचा अत्यंत उदात्त आणि समाजोन्नतीचा विचार करून शिक्षण विचाराची पेरणी केली. शिक्षक म्हणून काम करणार्या व्यक्तीच्या अंगी निश्चित काही गुण असायला हवेत. टागोरांनी सांगितलेल्या गुणांचा विचार केला तर फार काही अपेक्षा नाहीत, मात्र ज्या छोट्याशा अपेक्षा वाटत असल्या तरी शिक्षकांच्या दृष्टीने त्या वाटा निश्चितच कठीण आहेत. टागोर म्हणतात की, शिक्षकाला विद्यार्थ्याविषयी जिव्हाळा असायला हवा. शिक्षक म्हणून पहिली पात्रता म्हणजे विद्यार्थ्यांविषयीचे प्रेम आणि विद्यार्थी आवडायला हवेत. शिक्षणातून शांतता प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न असतो. शिक्षण समाजात अहिंसेचा विचार पेरत असते. त्यामुळे एका अर्थाने शिक्षण हा प्रेमाचा मार्ग आहे. जेथे प्रेमाचे नाते फुलते आणि बहरते तेथेच शिक्षणाचा आरंभ होतो. ज्या नात्यात व्यवहाराचा विचार केंद्रस्थानी असतो तेथे तर फक्त माहिती मिळते.
जेथे शिक्षणाची दुकानदारी असते तेथे संस्काराची शक्यता नाही. शिक्षणाची दुकानदारी करणारी व्यवस्था फक्त माहिती विकतील आणि विद्यार्थी पैसे देऊन माहिती घेतील, पण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थी गुणवत्तेची वाट चालावी असे वाटत असेल तर विद्यार्थी व शिक्षक यांच्या नात्यात अधिक घट्टपणा हवा. ते नाते जितके घट्ट असेल तितके शिक्षण उत्तम होते. शिक्षक व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांवर प्रथम निखळ प्रेम करता यायला हवे. प्रेम ही मोठी जादू आहे. जगाच्या पाठीवर समाज घडविणार्यांच्या अनुभवानुसार जग कायद्याने, नियमाने बदलत नाही, तर फक्त प्रेमाने बदलते. शिक्षक व विद्यार्थी एकमेकांवर प्रेम करू लागतील तर अधिक शिकू लागतील.
टागोरांनी हा अनुभव आपल्या शांतीनिकेतनमध्ये घेतला होता. दोघांमधील नाते जितके प्रेमाचे असेल तितके शिकणे अधिक होते. त्यामुळे टागोर म्हणतात त्याप्रमाणे शिक्षक होऊ पाहणार्या प्रत्येकाला विद्यार्थ्यांवर प्रेम करता यायला हवे. शाळा, महाविद्यालयात जाऊन प्रेमाचे वर्ग, शिकवणी लावून प्रेमाचा मार्ग निर्माण करता येत नाही. प्रेम ही आंतरिक भावना आहे. ती असेल तर जिव्हाळा निर्माण होतो. प्रेमाने माणसं नात्यात बांधली जातात. प्रेमामुळे द्वेष, मत्सर, राग, अहंकार या गोष्टी आपोआप गळून पडतात. या गोष्टी गळून पडल्या तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो. त्यामुळे शिक्षक होण्याची पहिली पात्रता म्हणजे मुलांवर प्रेम करता यायला हवे.
मुलांविषयी प्रेम असेल तरच शिकवणे परिणामकारक व प्रभावी होण्याची शक्यता असते. शिक्षक मुलांवर प्रेम करतो तेव्हाच विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी करण्यासाठी धजावतात. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी प्रेमाची जादूमय वाट चालण्याची गरज टागोर सातत्याने व्यक्त करीत आहेत. शिक्षकाला प्रेम करता आले नाही तर ते शिकवणे केवळ यांत्रिक होईल. कोणतेही शिकवणे हे आतून व्हायला हवे. शिकवण्यात आणि शिकण्यात जिवंतपणा यायला हवा. येथे दोघेही जिवंत आहेत. त्यामुळे ती प्रक्रिया जिवंत करण्यासाठी प्रेमाचा ओलावा असायला हवा. त्याकरिता ह्दयात प्रेम पाझरायला हवे. मुले आवडायला हवीत. मुले आवडत नसतील तर प्रेम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे दर्जा आणि गुणवत्तेची पाऊलवाट चालण्याकरिता प्रेम व्हायला हवे. त्याकरिता मुले आवडायला हवीत.
टागोर शिक्षकांचे गुण सांगताना म्हणतात की, शिक्षक हा अखंड विद्यार्थीच असायला हवा. नित्यनूतन शिकण्याची तयारी असणारा शिक्षक हा पदवीला योग्य असतो. वर्तमानात एकदा पदवी मिळवली की पुन्हा शिकण्याची गरज उरत नाही असे अनेकांना वाटू लागले आहे. मुळात निरंतर शिकणे हेच शिक्षण आहे. आपण शिकणे थांबवतो तेव्हा शरीर जिवंत असते आणि मन मेलेले असते. जिवंत राहण्यासाठी शिकायला हवे हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षक सातत्याने शिकत राहील तरच मुलांना नवे काही मिळू शकेल. नवीन ज्ञान जर मिळवण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याचे अध्यापन निरस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी म्हणजे सतत नवीन ज्ञानासाठीची तयारी असणारी व्यक्ती आहे.
त्यासाठी शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असायला हवा. तो वर्गापुरता शिक्षक असतो, पण इतर वेळी तो विद्यार्थीच असायला हवा. त्याशिवाय तो ज्ञानसाधक बनणार नाही. शिक्षक याच मनोवृत्तीचे असायला हवेत. ज्याला शिकण्याचा कंटाळा आहे, ज्याला नवीन ज्ञानाची भूक नाही, जो ज्ञानाची साधना करीत नाही, जो आपल्या आयुष्यात केवळ नोकरीसाठी मिळवलेल्या पदवी अथवा पदविकेवर खूश आहे अशी व्यक्ती शिक्षक होण्यास पात्र नाही. मुळात शिक्षक ज्ञानाच्या दृष्टीने सतत अतृप्त असायला हवेत. त्यांची ती अतृप्तता ज्ञानाचा प्रवास घडवत असते. त्यामुळे जीवनभर विद्यार्थी असणे हे शिक्षकपणाचे लक्षण आहे. मला अजून खूप शिकायचे आहे, मला अजून खूप ज्ञान मिळवायचे आहे, ज्याला विश्वातील ज्ञानाचा आवाका आहे अशी व्यक्ती शिक्षक होण्यास पात्र आहे.
आज या वाटा धुंडाळणारी माणसं दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. कधी एकेकाळी आपल्या देशातील माणसं म्हणजे ज्ञानाचा महासागर होते. एक एक व्यक्ती म्हणजे विद्यापीठाच्या उंचीचे होते. त्यामुळे त्याकाळी सत्ताधारीही शिक्षकांच्या चरणावर नतमस्तक होत होते. शिक्षक हे सतत ज्ञानप्रवासी म्हणून जगत होते. मुळात शिक्षक ज्ञानसंपन्न असेल तरच त्याला सन्मान मिळतो. जो ज्ञानाचा साधक नाही तो शिक्षक नाहीच. तो केवळ कर्मचारी ठरेल. त्यामुळे ज्ञानसंपन्नता हाच शिक्षकाचा विशेष गुण आहे याचा विचार करायला हवा. जीवनात आनंदी राहायचे असेल,आपल्या पेशात समाधान आणि आनंद हवा असेल तर निरंतर ज्ञानप्राप्तीला पर्याय नाही.
शिक्षकाला आपण मोठे आहोत, मुलांपेक्षा वेगळे आहोत असे कधीच वाटता कामा नये. मुलात मूल होण्याची हौस त्याला असायला हवी. त्याला प्रसंगी नाचता यायला हवे. कधी सोंगाड्या बनण्याची तयारी असायला हवी, असे मत टागोरांनी नोंदवले होते. या अंगाने विचार केला तर मध्यंतरी शासनाच्या प्रशिक्षणात गाणी म्हणताना म्हटले जात असे की, चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. शाळा बदलली बाई, गुरुजी नाचे गाणे गाई. खरंतर अशा वातावरणाची गरज व्यक्त केली जाते. शिक्षकाला विद्यार्थ्यांसोबत नाचता यायला हवे. प्रत्येक पात्रात जाऊन त्याला जगता आले तरच पाठातील आशय जिवंत होण्याची शक्यता आहे. नाहीतर ते केवळ निर्जीव शब्द ठरतील. शिक्षक हा उत्तम नट असायला हवा. त्याला विद्यार्थ्यांशी एकरूप होता यायला हवे. शिक्षक अतिरिक्त शिस्तीचा भोक्ता असता कामा नये. आपण फार शिस्तप्रिय आहोत असे मानणे धोक्याचे आहे. अशा वृत्तीचे शिक्षकच विद्यार्थ्यांना सांस्कृतिकदृष्ठ्या उत्तम शिक्षण देऊ शकतील ही अपेक्षा बरेच काही सांगणारी आहे.
Article: A teacher should be...