दि. 04 ऑक्टोंबर 2024
मराठी अभिजात झाली म्हणजे नेमकं काय? राज ठाकरेंनी सोप्या शब्दात समजावलं; एकदा वाचाच..Marathi Accorded Status of Classical Language Raj Thackeray Reacts:
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषिक म्हणून कशाप्रकारे जबाबदारी वाढली आहे हे राज यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. हा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं आहे? याचा काय फायदा होणार हे सुद्धा राज यांनी समजावून सांगितलं आहे.
मोदींचे मानले आभार
"आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो," असं राज ठाकरेंनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, " मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेव्हा नरेंद्र मोदी हे 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार मानतो," असं राज यांनी आवर्जून नमूद केलं आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे निकष काय?
"मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत," असं म्हणत राज यांनी निषकांची यादी पोस्ट केली आहे. यामध्ये पुढील बाबींचा त्यांनी उल्लेख केला आहे.
> भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
> या भाषेत प्राचीन साहित्य हवं.
> भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
> 'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात रंगनाथ पाठारेंचा अहवाल
"2012 साली ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल 2013 साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती," अशी आठवण राज यांनी सांगितली. पुढे बोलताना राज ठाकरेंनी आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील याचीही यादी दिली आहे.
> मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.
> भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.
> प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.
> महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.
> मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.
> प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
> अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.
ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा
"या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता," असं राज म्हणाले आहेत.
मनसेनं निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही 25 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास 12 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन," असं राज यांनी म्हटलं आहे.
दर्जा तर मिळाली आत मराठी भाषिकांची जबाबदारी काय?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे यावर बोलताना राज यांनी, "प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे," असं राज यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
What exactly does it mean that Marathi has become classic? Raj Thackeray explained in simple words; Read it once..
#Maharashtra #MarathiLanguage #MediaVNI
आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2024
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी… pic.twitter.com/lQ1u2VyGFH