दि. 07 मे 2026
गडचिरोली : शेतात लागवड केलेला २७ लाखांचा गांजा जप्त, आरोपीस अटक.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : धानोरा पोलिस ठाण्यांतर्गत परसवाडी येथील एका शेतावर पोलिसांनी धाड टाकून २७ लाख २५ हजार रुपये किमतीचा ५४.५० किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी मोरेश्वर हिरामण उसेंडी(५८) यास अटक करण्यात आली आहे.मोरेश्वर उसेंडी याने त्याच्या शेतात गांजा वनस्पतीची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उसेंडी याच्या शेतावर धाड टाकली. यावेळी तेथे गांजाची अनेक झाडे लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता ५४.५० किलो गांजा आढळून आला. ५० हजार रुपये प्रति किलोग्रॅम याप्रमाणे बाजारात या गांजाची किंमत २७ लाख २५ हजार रुपये एवढी आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मोरेश्वर उसेंडी याच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक टेंभुर्णे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शन्ज्ञत् स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, उपनिरीक्षक विकास चव्हाण, हवालदार सुधाकर दंडिकवार, धनंजय चौधरी, प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, संदीप भेंडारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जंगले आदींनी ही कारवाई केली.
Gadchiroli: Marijuana worth Rs 27 lakhs planted in a field seized, accused arrested!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI