Vidarbha News India - VNI
आतापर्यंतचा सर्वात मोठा अजगर पकडण्यास यश ...
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूरच्या शेतात एका भला मोठा तेरा फूट लांबीचा अजगर काल (शुक्रवार) दुपारच्या सुमारास पकडण्यात आला. यावर्षी मूल तालुक्यातून वीस अजगर पकडल्याची नोंद आहे.
मूल तालुक्यातील चांदापूर येथे बंडू कडूकर यांच्या शेतात धान कापणी सुरू आहे. धान कापणी करताना मजूरांना भला मोठा साप असल्याचे दिसून आले. त्यांनी काम बंद करून दिलीप पाल यांना याची माहिती दिली. मूल येथील सर्पमित्र तन्मय झिरे यांना माहिती देऊन बोलविण्यात आले. सर्पमित्र तन्मय झिरे आणि वेदांत निकूरे या दोघांनी तात्काळ चांदापूर गाठून धानात लपून बसलेल्या अजगराला मोठ्या शिताफीने पकडले.
तेरा फूट लांबीचा अजगर पकडताना दोघांना मोठी कसरत करावी लागली. हा अजगर वैनगंगा नदीकाठाने शेतात ठाण मांडून बसला असावा असा अंदाज आहे. तालुक्यातील चांदापूर हे गाव पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असल्याने येथील क्षेत्रसहायक विनोद कस्तूरे यांच्या उपस्थितीत तेरा फूट लांब अजगराला मूलच्या जंगलात निसर्गमुक्त करण्यात येणार आहे. येथील वन्यजीव अभ्यासक उमेशसिंह झिरे यांनी आत्तापर्यंत आठ ते बारा फुटापर्यंत अजगर पकडले होते.
परंतु तेरा फुटांचा अजगर तालुक्यात प्रथमच सापडल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी मोठया प्रमाणात वैनंगगा नदीला पुराचा विळखा होता. धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. महापुरामुळे अजगर शेतापर्यंत आले. त्यामुळे यावर्षी वीस अजगर पकडल्याची माहिती उमेशसिंह झिरे यांनी दिली.