दि. १२ फेब्रुवारी २०२३
आदिवासी गौरव प्रवास अनुभवातून नेतृत्व या सात दिवसीय कार्यशाळेचा समारोप
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षक आणि प्राचार्यांची सात दिवसांची कार्यशाळा 'आदिवासी गौरव प्रवास- अनुभवातून नेतृत्व 'या विषयावर नुकतीच पार पडली. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आनंदवन येथे पार पडले. अनुभवात्मक नेतृत्व प्रशिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागातअनुभवात्मक शिक्षण हे सर्व शिकण्याच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी असते. चंद्रपूर आणि गडचिरोली हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग आहे. या जिल्ह्यात आरोग्य सेवा, शिक्षण, जंगल व्यवस्थापन इत्यादी विविध पायांवर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. या भागात आदिवासीचे प्राबल्य आहे. आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या कामाचा परिणाम थेट लाभाथ्यांवर दिसून येतो. स्वयंसेवी संस्थांकडून सुरु असलेल्या या सर्व मौल्यवान प्रयत्नांबद्दल शैक्षणिक संस्था पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्राच्या इतर भागातील प्राध्यापकांना आणि प्राचार्य यांना विद्यापीठाच्या परिसरात राहणाऱ्या आदिवासी आणि ग्रामीण लोकांची स्थिती तसेच आदिवासी लोकांच्या जीवनावर विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचा प्रभाव याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचा समारोप गोंडवाना विद्यापीठात करण्यात आला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोप पार पडला. या समारोपाच्या वेळी डॉ. नरेश मडावी, डॉ. रूपेंद्र कुमार कौर यांनी ग्रामसभेच्या एकल प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले.ही सात दिवसीय कार्यशाळा कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. डॉ. प्रिया गेडाम या कार्यशाळेच्या समन्वयक होत्या.
या ठिकाणी झाली सात दिवसीय कार्यशाळा
आनंदवन वरोरा येथे कार्यशाळेचे उद्घाटन,डॉ. विकास आमटे यांच्याशी संवाद,सोमनाथ येथे कौस्तुभ आमटे आणि पल्लवी आमटे यांच्याशी संवाद आणि येथील प्रकल्पा भेट,
अहेरी येथे डॉ. डांबोले यांच्या शी संवाद आणि पेठा प्रोजेक्ट बाबत विस्तृत माहिती लोकबिरादरी प्रकल्पाला भेट
डॉ. दिगंत आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी संवाद, येथील हेमलकसा प्रकल्पाला भेट ,सर्च प्रकल्प, चातगाव येथे भेट व डॉ. अभय बंग यांच्याशी संवाद,देवाजी तोफा यांच्याशी संवाद