कुरमा घर... लेख.... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

कुरमा घर... लेख....

MEDIA VNI
"कुरमा घर" 
लेखन प्रवीण यादव मुंजमकर 
शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोडदा 
पंचायत समिती देसाईगंज, जिल्हा गडचिरोली
मीडिया वी. एन. आय
गडचिरोली : कुरमा घर हे नाव ऐकून तुम्हाला काहीतरी विशिष्ट वास्तू असल्याचा भास नक्कीच झाला असेल. काय तुम्हाला माहित आहे की, हे कुरमा घर काय आहे? या कुरमा घराचा उपयोग कशासाठी होत असतो? हे कुरमा घर नक्की कुठे अस्तित्वात आहे? घरात खरंच कुरमा घराची आवश्यकता आहे? काय 21व्या शतकामध्ये कुरमा घर ही विसंगती तर नाही ना? अशा अनेक समस्या आपल्याला कुरमा घराविषयी बोलताना विचारात घ्यावे लागतील. 
मित्रहो, कुरमा घर हे दुसरे तिसरे काही नसून समाजाने महिलांच्या सोयीसाठी केलेली एक व्यवस्थाच आहे. आता ती व्यवस्था कशी आहे या संबंधाने आपण माहिती बघूया.
गडचिरोली जिल्ह्यातील माझे वास्तव्य व जन्म आणि कर्मभूमी गडचिरोली असल्याने गडचिरोलीतील विविध भागांचा अभ्यास करणे माझी आवड बनली. मग सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड पासून तर थेट कोरची, कुरखेडा पर्यंतच्या विविध तालुक्यांमध्ये जाऊन तेथील विविध जमातींचा लोकजीवनाचा अभ्यास करत असताना विविध गोष्टी आढळल्या. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे कुरमा घर. आदिवासी समाज जीवनाचा अभ्यास करताना एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे गोटूल आणि दुसरी कुर्मा घर. प्रत्येक गावात एक गोटूल परंतु प्रत्येक घरात एक कुर्मा घर. एटापल्ली तालुक्यात माझ्या नोकरीची दहा वर्षे काढल्यानंतर मौजा बांडे या गावात राहून आदिवासी समाज जीवनाचा अगदी जवळून अभ्यास करताना  असे आढळून आले की गोटूल हे सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीचे ठिकाण नक्की आहे. परंतु कुरमा घर मात्र स्त्रियांकरिता केलेली विशेष व्यवस्था ही प्रत्येक घरात आढळून आली आहे. प्रत्येक घर हे स्त्री आणि पुरुष मिळून बनलेलं असते. पुरुष मंडळी स्त्रियांवर आपला अधिकारही गाजवतात. पुरुषप्रधान संस्कृती भारताने अंगीकारलेली आहे हे आपण इतिहासात शिकलेलो आहोत. पण आजही आदिवासी समाजामध्ये कुटुंबाचे नेतृत्व करताना स्त्रिया दिसतात. म्हणजे मूळ भारतीय संस्कृती ही स्त्रीप्रधान होती हे आपल्याला यातून समजते. आता कुरमा घर आणि स्त्रीप्रधान संस्कृती यांचा काय संबंध आहे ते समजून घेऊ. 
आदिवासी समाजामध्ये घरातील कामे तसेच शेतातील, बाहेरची कामे स्त्रिया प्रामुख्याने करताना दिसतात.  परंतु स्त्रियांना मासिक पाळी मध्ये मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कामे आदिवासी समाजामध्ये निषिद्ध मानली जातात. त्यामुळे कुठलीच कामे करू देत नाही.  त्या पाच दिवसांमध्ये त्या एकांतात विश्राम करीत राहतात. त्यावर कोणाची दृष्टी पडू नये किंवा लोकांचा संपर्क येऊन संसर्ग होऊ नये अशा भावनेतून पाळीच्या मासिक पाळीच्या पाच दिवसांमध्ये स्त्रियांना विलगीकरणात राहण्याकरिता करण्यात आलेली व्यवस्था म्हणजेच कुरमा घर होय. काळा नुसार कुरमा घर हे दुर्लक्षित राहिलेत. कुरमा घराच्या समस्या अनेक आहेत. परंतु त्या मागचा उद्देश मात्र हा निश्चितच शुद्ध आहे. मासिक पाळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून  स्त्री ला विलगीकरणात ठेवण्याची ही एक सोय आहे. स्त्रियांना मासिक पाळी मध्ये शरीरातून रक्तस्त्राव सुरू असतो आणि त्यामुळे शरीरामध्ये एक क्षीणता आलेली असते. ही क्षीणता घालविण्याकरिता त्यांना आरामाची सक्त जरूरत असते. म्हणून त्यांना आराम मिळण्याकरिता कुरमा घराची एक वेगळी व्यवस्था असते. आदिवासी समाजामध्ये मासिक पाळीत असलेल्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे काम देत नाही. यामागचे दोन उद्देश - सर्वप्रथम त्यांना शारीरिक विश्राम मिळावा आणि दुसरे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यात यावे. म्हणून एकंदरीत काय तर मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांना संसर्गापासून वाचण्याकरिता, त्यांना आराम मिळण्याकरिता, त्यांची तब्येत जपण्याकरिता निर्माण केलेली एक व्यवस्था म्हणजेच कुरमाघर होय. पाळीच्या वेळेस स्त्रिया ज्या घरामध्ये  एका झोपडी मध्ये किंवा एका खोलीत राहतात ते ठिकाण म्हणजे कुरमा घर होय. 
आता ह्या कुरमा घराची अवस्था कशी असायला पाहिजे? जर कुरमा घर असेल तर ते स्वच्छ, नीटनेटकं असलं पाहिजे. ओलावा येता कामा नये. तिथे व्यवस्थित सूर्यप्रकाशाची व्यवस्था असायला पाहिजे. भिंती व्यवस्थित बांधलेल्या असाव्यात. छत व्यवस्थित असावं. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण असावं. वगैरे वगैरे. पण वास्तविक ही कुरमा घरं सध्या फार दुर्लक्षित झालेले आहे. घराच्या मागच्या भागांमध्ये अतिशय पडझड झालेल्या झोपडीमध्ये, व्यवस्थित भिंती न बांधलेल्या, व्यवस्थित छत न असलेल्या दुर्लक्षित ठिकाणी असे कुरमा घर आपल्याला आढळून येते. त्यामुळे स्त्रियांना विविध गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. पावसाचे पाणी गळत असल्याने ओलावा राहतो त्याच्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. अंगावरचे कपडे वाळत नसल्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. 
तिथे विजेची,दिव्याची सोय नाही किंवा व्यवस्थित लाइटिंग नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कीटक, सर्प, विंचू अशा विषारी प्राण्यांपासून धोका असतो. दुर्लक्षित ठिकाण असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसतात अशा विविध समस्यांचा सामना कुरमा घरामध्ये आजच्या घडीला करावा लागत आहे. पण यामधून जर बाहेर पडायचं असेल तर जर कुरमा घर असेल तर ते स्वच्छ नीटनेटकं असावं. 
नाहीतर खरंच कुरमा घराची गरज आहे काय?
२१ व्या शतकामध्ये या प्रश्नाचे उत्तर आता जर विचारलं तर उत्तर आहे अजिबात नाही. कुरमा घराची गरज नाही परंतु संस्कृतीने जपत आल्यामुळे जर कुरमा घर पाळायचं असेल तर कुरमा कर हे स्वच्छ नीटनेटक असलं पाहिजे. यामध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव करता कामा नये. म्हणून जर कुरमा घर असेल तर ते ठीक आहे परंतु जर स्त्रियांना आवश्यक त्या सोयी सुविधा न पुरवता जर तुम्ही त्यांना बाहेर ठेवत असाल तर मात्र हे कुरमा घर अभिशाप होईल.  स्त्रियांकरिता त्यांच्या तब्येती बिघडण्याचे कारण हे कुरमाघर असू शकेल. दुर्लक्षित असल्यामुळे आपले लक्ष राहत नाही. घराच्या मागच्या भागात असल्यामुळे घरच्यांच लक्ष राहत नाही आणि मग अशा वेळेस गाव खेड्यामध्ये विविध प्रसंग घडू शकतात.  त्या प्रसंगापासून आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला काही खबरदारी घेणं जरुरीचा आहे. 
आधुनिक शतकामध्ये जगत असताना सहजीवनामधूनच आपण घरातील महिलांची देखभाल करू शकतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झालेली आहे. मासिक पाळीच्या वेळेस येणाऱ्या समस्येपासून वाचण्याकरिता आपल्या लेकींना, मुलींना सॅनिटरी पॅडच्या वापराबद्दल योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. योग्य वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट यापासून आपण वयात आलेल्या मुलींना मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या संसर्गापासून वाचवू शकतो.  हे करणे काळाची गरजच आहे आणि अगदी कमी पैशांमध्ये आपण हे सर्व करू शकतो. म्हणून आज कुर्मा घराची गरज नाही. परंतु जर तुम्हाला सांस्कृतिक ठेवा जर जपायचाच असेल तर कुरमा घर मात्र हे स्वच्छ आणि नेटकच असायला पाहिजे. नाहीतर सॅनिटरी पॅड वापरून त्याची व्यवस्थित विल्हेवाट करूनच तुम्ही घरामध्येच आपलं आधुनिक कुरमा घर करू शकता. अर्थातच ज्या कुरमा घरामध्ये स्त्री राहून आपल्या भविष्यात जननी होण्याकरिता सुरक्षित असते ते कुरमा घर मात्र खरंच पवित्र होईल. आज त्या कुरमा घर भौतिक आणि  मानसिकरित्या पवित्र व स्वच्छ ठेवणे, मानसिकरित्या कुरमा घर स्विकार करणे, मुलींना वयात येतांना होणाऱ्या बदलांना सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे, त्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता प्रदान करणे हेच खरं २१ व्या शतकातील कुरुमा घर होय.    म्हणजेच मित्रहो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये भौतिकरित्या असलेले कुरुमाघर स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या विविध संसर्गापासून, आजारापासून वाचवण्याकरिता निर्माण केलेली एक पवित्र व्यवस्थाच होय. 

                                                                                               लेखक :-
श्री. प्रवीण यादव मुंजमकर 
मोबाईल क्रमांक ‌7972983787, 9420187065

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->