संविधान उद्देशिका आता आदिम माडिया भाषेत, जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

संविधान उद्देशिका आता आदिम माडिया भाषेत, जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार...

दि. 08.04.2023

MEDIA VNI

संविधान उद्देशिका आता आदिम माडिया भाषेत, जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार...

मीडिया वी. एन.आय :

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. मागील वर्षी पाथ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 94 टक्के माडिया समाज बांधवांनी 'संविधान' हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते.

ही बाब लक्षात घेता भारतीय संविधान उद्देशिकेचा भामरागड येथील माडिया समाजातील पहिले वकील ॲड.लालसू नोगोटी, हेमलकसा येथील चिन्ना महाका व चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक आदिम माडिया भाषेत अनुवाद केला आहे.

देशात एकूण 75 आदिम समुदाय आहेत. त्यात महाराष्ट्रात कोलाम, कातकरी आणि माडिया या तीन आदिम जमाती आहे. राज्यातील एकूण 3 आदिम समुदायांपैकी जल, जंगल, जमिनीवर उपजीविका करणारा हा एक समुदाय. शिक्षणाची कमी, जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक या समाजात दिसतो. स्वतंत्र बोलीभाषा व संस्कृती या समुदायाची ओळख. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही मुलभूत गरजांचीच पुर्तता अद्याप या परिसरात होऊ शकलेली नाही. हक्क आणि अधिकाराची होणारी गळचेपी या समुदायासाठी नित्याचीच बाब झाली आहे. अशा या भागात भारतीय संविधान त्यांच्याच बोलीभाषेत पोहोचणे गरजेचे आहे. संविधान उद्देशिका म्हणजे संविधानाच्या प्रतीचा सार आहे. त्यामुळे या उद्देशिकेच्या माध्यमातून नक्षल प्रभावित भागात संविधानाबाबत जनजागृती करण्याचा एक सकारात्मक अन् प्रामाणिक प्रयत्न केला जातो आहे. माडिया समाजामध्ये या संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती निर्माण झाल्यास कालांतराने हक्काबाबत, देशाचे संविधान अवलंबण्याबाबत आमुलाग्र बदल होईल. संविधान तळागाळात- घराघरांत पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे. माडिया समाजाला आपल्या मातृभाषेत उद्देशिका कळावी अन् त्यातून जनजागृती करता यावी म्हणून आम्ही हा अनुवाद केला असे ॲड.लालसू नोगोटी, चिन्ना महाका, अविनाश पोईनकर यांनी सांगितले.

अनुवादाबाबत प्रशासन अनभिज्ञ

संविधान म्हणजे काय, हे समजावून सांगण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या दुर्गम भागामध्ये प्रशासन गेली अनेक दशके प्रयत्न करीत असले तरी आदिम माडिया भाषेतून ते नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. संविधान उद्देशिकेचा आजवर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मात्र, आदीम अन् त्यातल्या त्यात नक्षल प्रभावित भागातील या माडिया भाषेत संविधान उद्देशिकेचा अनुवाद पहिल्यांदाच झाला असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासन या अनुवादाबाबत सध्या अनभिज्ञ असले तरी या राष्ट्रीय कार्याची दखल घेवून या दुर्गम परिसरात शाळा, महाविद्यालय, शासकिय-निमशासकिय कार्यालयातून माडिया भाषेतील संविधान उद्देशिका पोहोचवून जनजागर करणे आवश्यक आहे.

तोडगट्टा आंदोलनात माडिया उद्देशिकेचे वाचन

मागील 26 दिवसांपासून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड व प्रस्तावित ६ खदाणींच्या विरोधात येथील माडिया आदिवासींचे आंदोलन सुरु आहे. पेसा, वनाधिकार कायद्याने आदिवासींना बळ दिले. सामुहिक वनहक्क बहाल केले. मात्र जल, जंगल, जमीनीचे हक्क ग्रामसभांना असतांनाही स्थानिक नागरिक व ग्रामसभांची कुठलीही परवानगी न घेता अवैध खदाणी शासन करत असून नैसर्गिक संसाधनाची लूट करत आहे. याविरोधात तोडगट्टा येथे परिसरातील 70 ग्रामसभा व सुरजागडपट्टी पारंपारिक इलाका गोटूल समीतीच्या वतीने रोज शेकडो नागरिक शांतता व संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे. या आंदोलनात माडिया भाषेतील संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन पहिल्यांदाच करण्यात आले.

ऐतिहासिक काम

भारतीय संविधान व उद्देशिका भारतातील सर्व बोलीभाषेत अनुवादित झाले पाहीजे, तरच संविधान तळागाळात पोहोचेल. आम्ही जमीनीस्तरावर काम करतांना संविधानाचा सार आदिम माडिया समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज लक्षात आली, या हेतूने हे ऐतिहासिक काम करण्याचा प्रयत्न केला. याचा सकारात्मक परिणाम या अतिदुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्रात दिसून येत असून यातून हक्क, अधिकार व कर्तव्याच्या जाणीवांची व्यापक जनजागृती घडून येण्यास सहाय्य होईल.

- अविनाश पोईनकर, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर


Share News

copylock

Post Top Advertisement

-->