दि. 10.09.2023
MEDIA VNI
परीक्षा घेताच कशाला? सरळ बोली लावून पदाचा लिलाव करा; पेपरफुटीमुळे परीक्षार्थींचा संताप.!
मीडिया वी.एन.आय :
नागपूर : राज्यात विविध विभागामार्फत सुरू असलेल्या सरळसेवा भरतीमध्ये रोज नवीन घोटाळे समोर येत आहेत. या भरतीसाठी लाखो तरूण-तरूणी जीव तोडून अभ्यास करतात. हजारो रुपयांची पुस्तके विकत घेतात, हजारो रुपये खर्च करून क्लासेस लावतात.
मात्र पेपर सुरू होताच दुसर्या मिनिटाला प्रश्नपत्रिका बाहेर येते व विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी जाते. कितीतरी एजंट विविध क्लृप्त्या वापरून या जागा मॅनेज करण्यात यशस्वी झालेले असतात. अनेकदा तक्रारीनंतर पोलीस या एजंटांना पेपर फोडण्याच्या सर्व साहित्यासह पकडतात, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करतात. परंतु हे एजंट आठ दिवसात जामीन मिळवून दुसरी भरती प्रक्रीया मॅनेज करण्याच्या कामाला लागतात. सरकार जर परीक्षेतील गैरप्रकार थांबवू शकत नसेल तर या भरती प्रक्रीयेतील पदांच्या बोली लावायला हव्यात, अशी मागणीच परीक्षार्थी करू लागले आहेत.
वनरक्षक, तलाठी भरतींमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक पद मॅनेज करण्यात आले आहे. काही ठिकाणी अख्खे परिक्षा केंद्र मॅनेज करण्याचा प्रकार झाला. ज्या म्हणून नामांकित कंपन्यांना या नोकर भरतीचे टेंडर देण्यात आले त्या कंपन्यांचे कर्मचारीच भरती घोटाळ्यातील एजंटांना मॅनेज करण्यात आल्याचे दिसत आहे. मागच्या दोन वर्षापुर्वी आरोग्य विभागात गट 'क' आणि गट 'ड' संवर्गासाठी भरती प्रक्रीया पार पडली. या भरती प्रक्रीयेत सगळा घोटाळा उघड होऊनही हे लोक पुन्हा उजळमाथ्याने नोकरीवर रुजू झाले. त्यामुळे भरती प्रक्रीयेतील पदांच्या बोली लावायला हव्यात अशी मागणी केली जात आहे.