दि. 26.09.2023
‘एकात्म मानववाद’ अध्यासनासाठी बोधचिन्ह तयार करा ; डॉ. प्रशांत बोकारे
- पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त खुल्या स्पर्धेची घोषणा
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन केंद्राच्या वतीने पं. उपाध्याय यांची जयंती सोमवार, २५ सप्टेंबर रोजी, गोंडवाना विद्यापीठात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एकात्म मानववाद’ अध्यासन केंद्रासाठी खुल्या बोधचिन्ह स्पर्धेची घोषणा करण्यात आली. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ईच्छुक कलावंतांनी या केंद्रासाठी बोधचिन्ह (लोगो) तयार करून विद्यापीठाला पाठवायचे आहे. तीन सर्वोत्कृष्ट बोधचिन्हांना अनुक्रमे५००१ रूपये, २००१ आणि १००१ रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विचारांचा सर्वांगीण अभ्यास तसेच प्रचार-प्रसार करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठात पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन केंद्र सुरु करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा या केंद्राच्या वाटचालीत योगदान असावे आणि अध्यासन केंद्राच्या विकासात सर्वांनाच सहभागी होता यावे म्हणून पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अध्यासन केंद्राचे बोधचिन्ह ठरविण्याकरिता स्पर्धा अयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बोधचिन्हाला पुढे अध्यासनाचे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाणार आहे.
पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन केंद्राच्या बोधचिन्हाची (लोगो) ही प्रतियोगिता सर्वांसाठी खुली असणार आहे. स्पर्धेचे रोख पारितोषिक प्रथम रु.५००१, द्वितीय रु.२००१ आणि तृतीय रु.१००१ तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत बोधचिन्हासह आपले पूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि इमेल पीडीएफ स्वरुपात pdmac.unigug@gmail.com या इमेल आयडीवर पाठवावे, असे आवाहन अध्यासन केंद्राच्या समितीने केले आहे.
याप्रसंगी समितीची बैठकही आयोजित करण्यात आली. यावेळी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. बैठकीत समिती विस्ताराची चर्चा करण्यात आली आणि येत्या काळात या केंद्राच्या माध्यमातून अपेक्षित कार्याचा आराखडा ठरवला गेला. बैठकीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह अध्यासनाचे प्रस्तावक संजय रामगिरवार, डॉ. संजय गोरे, प्रशांत दोंतुलवार, किरण गजपुरे, यश बांगडे, केंद्राचे समन्वयक डॉ. अनिरुध्द गचके प्रभृती उपस्थित होते.