दि. 22.10.2023
MEDIA VNI
MP Assembly Election: भाजपची अखेरची यादी जाहीर! विद्यमान ३० आमदारांची उमेदवारी कापली, नव्या चेहऱ्यांना संधी.!
Madhya Pradesh : मध्यप्रदेश
मीडिया वी.एन.आय :
MP Assembly Election: भाजपने आज ९२ जणांची अखेरची यादी जाहीर केली. यात नव्या चेहऱ्यांना संधी देत जवळपास विद्यमान ३० आमदारांची उमेदवारी कापली आहे. यामुळे भाजपने विद्यमान आमदारांवर तलवार चालविण्याचे काम अखेरच्या यादीत केलेले दिसून येते.
विशेष म्हणजे यात एकाही खासदारांचा समावेश नसून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवपुरीतून उमेदवारी दिली जाईल, हे वृत्तही अफवा ठरले.
भाजपने मध्यप्रदेशची उमेदवारांची यादी पाच टप्प्यात जाहीर केली. यात ही शेवटची यादी आमदारांसाठी अप्रिय ठरली आहे. घोषित ९१ उमेदवारांमध्ये जवळपास ३० उमेदवार हे नवे आहेत. यामुळे जवळपास एकतृतीयांश नवे चेहरे भाजपने दिले. (MP Assembly Election)
यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवपुरीतून उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु या मतदारसंघातून भाजपने देवेंद्रकुमार जैन यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघाचे नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा राजे शिंदे करीत होत्या. परंतु त्यांनी ही निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवार नाकारण्यात आलेल्यांमध्ये कैलास विजयवर्गीय यांचे सुपुत्र आकाश विजयवर्गीय यांचा समावेश आहे.
कोलारसचे आमदार महेंद्र यादव यांच्या जागी वीरेंद्र रघुवंशी यांना उमेदवारी दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना या यादीत स्थान मिळाले. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या महेंद्र सिंह सिसोदिया यांना बमोरीतून भाजपने उमेदवारी दिली. अशोकनगर मतदारसंघातून जयपाल सिंह या शिंदे समर्थकाला उमेदवारी मिळाली. याशिवाय बडवाह मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार सचिन बिर्ला यांना रिंगणात उतरविले. (Latest Marathi News)