दि. 1 ऑक्टोंबर 2023
MEDIA VNI
भारताच्या 'या' कोपऱ्यात सापडली 1 लाख 34 हजार कोटींची सोन्याची खाणं, लवकरच होणार लिलाव...
मीडिया वी.एन.आय :
राजस्थान : राजस्थानात आता सोन्याच्या खाणींचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांसवाडामध्ये तीन दशकांपूर्वी सोन्याचे साठे सापडले होते. त्यातून सोनं काढण्याची सुरुवात आता केली जाईल.
हे प्रकरण दीर्घ काळ कोर्टात प्रलंबित असल्याने सोनं काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. आता कोर्टाकडून परवानगी मिळाल्याने सोन्याच्या खाणींच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाने सरकारी पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतर खाण, पेट्रोलियम आणि गोपालन मंत्री प्रमोद जैन भाया यांनी सांगितलं, की आता राज्यात सोन्याच्या खाणींचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बांसवाड्यातल्या भूखिया जगपुरा क्षेत्रात सोन्याचा मोठा साठा असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात असल्याने लिलाव करता येत नव्हता, असं प्रमोद जैन भाया यांनी सांगितलं. खाण विभागाकडून नियोजनबद्ध पद्धतीने त्या प्रदेशातल्या खनिजांचा साठा शोधला जात आहे. तसंच खाणींच्या ई-लिलावावर भर दिला जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम होत आहेत. कारण महसुलात वाढ झाली असून, रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अवैध खाणकामावरही नियंत्रण मिळवता येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू आहे, असं प्रमोद जैन भाया यांनी सांगितलं.
माइन्स, पेट्रोलियम आणि उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वीनू गुप्ता यांनी सांगितलं, की हायकोर्टात राज्य सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली. त्यामुळे राज्यातल्या सोन्याच्या पहिल्या खाणीच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला. भूखिया जगपुरा क्षेत्रात सोन्याच्या खाणीच्या लिलावाकरिता आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जात आहे. एका ढोबळ अंदाजानुसार, तिथे एक लाख 34 हजार 178 कोटी रुपयांच्या सोन्याचा आणि 7720 कोटी रुपयांच्या तांब्याचा साठा असण्याची शक्यता आहे. 'एबीपी लाइव्ह'ने या संदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
माइन्स डायरेक्टर संदेश नायक यांनी सांगितलं, की बांसवाड्याच्या घाटोल तालुक्याच्या भूखिया जगपुरा क्षेत्रात भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाद्वारे 1990-91मध्ये घेतल्या गेलेल्या शोधात सोन्याच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले होते. त्यामुळे 69.658 स्क्वेअर किलोमीटरचे तीन ब्लॉक्स शोधासाठी आरक्षित करण्यात आले होते. त्या क्षेत्रातल्या शोधावेळी 15 ब्लॉक्समध्ये 171 बोअर होल्समध्ये 46037.17 मीटर ड्रिलिंगनंतर सोन्याचा साठा सापडला. 14 ब्लॉक्समध्ये 1.945 ग्रॅम प्रति टन या हिशेबाने तब्बल 114.76 दशलक्ष टन एवढा सोन्याचा साठा असण्याचा अंदाज आहे.
संदेश नायक यांनी सांगितलं, की एका ढोबळ अंदाजानुसार या क्षेत्रात 223.63 टन एवढं सोनं मिळण्याची शक्यता आहे. सोन्यासोबतच 0.15 टक्के तांब्याचा साठाही आहे. एक लाख 54 हजार 401 टन एवढा तांब्याचा साठा असू शकतो, असा अंदाज आहे. कोबाल्ट धातूही या भागात असल्याचे संकेत मिळाले आहेत. 13 हजार 739 टन कोबाल्टसह 11,146 टन निकेल धातू असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर खाण विभागाने लिलावासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करायला सुरुवात केली आहे. सोन्याच्या खाणींमुळे राज्याला नवी ओळख प्राप्त होईल, सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील, असं संदेश नायक यांनी सांगितलं.