दि. 08.02.2024
गडचिरोली : जिल्ह्यातील 'मायनिंग कॉरिडॉर'चा मार्ग मोकळा; 84 किमी लांबीच्या विशेष महामार्गाला मंजुरी.!
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील सूरजागड टेकडीवर मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले लोहखनिज उत्खणन आणि हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले होते.
यावर तोडगा म्हणून पालकमंत्र्यांनी ‘मायनिंग कॉरिडॉर’ निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून राज्यशासनाने नवेगाव मोर ते सूरजागड 84 किमी लांबीच्या ‘ग्रीनफिल्ड’ विशेष महामार्गाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची अवजड वाहतुकीतून सुटका होणार आहे.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खणन यशस्वीरीत्या सुरू झाल्याने प्रशासन त्याभागातील प्रलंबित खाणपट्टे खुले करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उत्खणन केलेल्या खनिजाची सुरळीत वाहतूकीकरिता ‘मायनिंग कॉरिडॉर’ निर्माण करण्याची गरज होती. वर्षभरापूर्वी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा देखील केली होती. बुधवारी राज्य शासनाने परिपत्रक काढून नावेगाव मोर ते सूरजागड अशा 84.63 किमीच्या विशेष महामार्गाला मान्यता दिली. यामुळे राज्याच्या विकसित भागांत खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतपणे आणि किफायतशिर किमतीत होण्याच्या मदत होणार आहे. सोबतच वाहतुकीमुळे सुरू असलेली अपघातांची मालिकादेखील खंडित होणार आणि आसपासच्या गावांना धुळीपासून मुक्ती मिळणार आहे. भविष्यात होऊ घातलेल्या मोठ मोठ्या प्रकल्पांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सरकार गडचिरोलीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर देत आहे. त्यामुळेच जिल्ह्याला समृध्दी आणि भारतमालासारखे शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचे कार्य सुरू झाले आहे.
कोनसरीच्या प्रकल्पात सुमारे 15 हजार रोजगार निर्मिती होऊन परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास होईल. याशिवाय रस्त्यामुळे या भागातील आदिवासी गावांना आरोग्यविषयक सुविधांबरोबर इतर शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा शासनाच्या परिपत्रकात करण्यात आला आहे.
असा राहणार विशेष महामार्ग
वाढत्या खनिज वाहतुकीसाठी मुत्तापूर-वडलापेठ- वेलगूर- टोला- येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा- हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या विशेष महामार्गावरून केवळ खानिजाची वाहतूक होणार आहे. त्यामुळे धूळ आणि अपघात यातून नागरिकांची सुटका होणार आहे.
Gadchiroli News : Paving the way for 'mining corridor' in the district; Approval for 84 km long special highway.!