दि. 12.02.2024
MEDIA VNI
Gadchiroli News : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात SRPF पोलिसाने गोळी झाडून केली आत्महत्या.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 'आदमी मरता है, मगर आत्मा नही...' असे स्टेट्स व्हाट्सअपला ठेऊन राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
१२ फेब्रुवारी रोजी आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. श्रीरामे यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. SRPF राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्र. १ मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी शिखरदीप बंगल्यात ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सोमवारी आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर इतर सुरक्षा रक्षक धावत आले तेंव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे सुटीवरून बाहेर गावाहून गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते. या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर धाव घेतली. पंचनामा सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले. तपास सुरू असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
Gadchiroli News : SRPF policeman committed suicide by shooting himself in the collector's bungalow.