दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. तसेच, नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. जवळपास १ तासापासून ईव्हीएम बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.
याचबरोबर, वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला पोहोचले. अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. सकाळी सव्वापाच वाजता संबंधित केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मशीन दुरुस्त करण्यात आले होते. परंतु मतदान सुरवात झाल्यानंतर सुद्धा ही मशीन नादुरुस्त असल्याने खासदार तडस यांना थांबून राहावे लागले. त्यामुळे मतदारांची रांग लागली होती. ४० मिनिटानंतर सुरळीत सुरू झाले.
राज्यातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान
महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात बऱ्याच लोकांना मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Technical failure in EVM EVMs in Maharashtra; The voting process is disrupted.!