दि. 06 जून 2024
MEDIA VNIGadchiroli : गोंडवाना विद्यापीठात करोडो रुपयांची अफरातफर उघड; लिपीकांना अटक.!
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत तृतीय श्रेणी तीन लिपिकांनी सिनेट सदस्य, विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्यांच्या देयकाची रक्कम संबंधितांच्या बॅंक खात्यात वळती न करता स्वत:च्या खात्यात वळती करून १.४६ काेटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले.
दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने गडचिराेली पाेलिसांनी तीनही लिपिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. जिल्हा न्यायालयाने ५ जून राेजी या आराेपींना १० जूनपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
विद्यापीठाने यासंबंधी चौकशी केली असता १.४६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस स्टेशन, गडचिरोली येथे तक्रार दाखल करण्यात आली. या गैरव्यवहाराची बाब निदर्शनास येताच विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती पावले उचलत संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली असून संबंधित तीनही लिपिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
महेंद्रकुमार उसेंडी (३७), अमित जांभुळे (३८), अमाेल रंगारी (३६) व प्रिया पगाडे या चार आराेपी लिपिकांवर गडचिराेली पाेलिसांनी भादंविचे कलम ४२०, ४०९ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला. यापैकी प्रिया पगाडे वगळता इतर तीन लिपिक पाेलिस काेठडीत आहेत, अशी माहिती गडचिराेलीचे पाेलिस निरीक्षक अरूण फेगळे यांनी दिली. मोठ्या रकमेचा हा अपहार उजेडात आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे.
चार जणांच्या ९ खात्यात टाकली रक्कम
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आराेपी महेशकुमार उसेंडी यांची स्वत:च्या नावाची सहा खाती आहेत. तर तीन लिपिकांची प्रत्येकी एक असे तीन खात्यात रक्कम वळती करण्यात आली. प्रवास भत्त्याच्या देयकाची रक्कम एकूण ९ खात्यात वळती करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या दाेन वर्षांत या ९ खात्यात एकूण १.४६ काेटी रुपये वळते करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने गडचिराेली पाेलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.
Gadchiroli: Gondwana University scandal of crores of rupees exposed; The clerk was arrested.