दि. 09 फेब्रुवारी 2025
हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेकरीता आरोग्य यंत्रणा सज्ज.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : जिल्ह्यात 10 ते 23 फेबुवारी २०२५ या कालावधीत कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या ७ तालुक्यात हत्तीरोग आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून १०० टक्के पात्र नागरिकांना डी.ई.सी., अल्बेंडाझोल सोबतच आयवरमेक्टीन गोळ्या या तीन औषधांची मात्रा उंची व वयोगटानुसार देण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान पात्र नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाने निर्धारित केले आहे. त्या अनुषंगाने ७ तालुक्यातील ७२२४२३ पात्र लोकसंखेला हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार (IDA) मोहीमे दरम्यान प्रत्यक्ष औषधोपचार करण्यात येणार आहे. त्याकरिता ग्राम पातळीवर ३१०९ कर्मचाऱ्यांची १५६५ पथके गठीत करण्यात आलेली असून त्यांचे पर्यवेक्षणा करिता ३१३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोबतच गावपातळीवर मोहिमेकरिता लागणारी औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
मोहीम कालावधीत उपरोक्त तालुक्यातील सर्व नागरिकांनी हत्तीरोग विरोधी गोळ्याचे सेवन करावे व हतीरोगाचे उच्चाटन करावे असे आवाहन मा. श्री. अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेच्या तयारीबद्दल मा. श्री. सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांनी दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ ला आरोग्य समिती सभेमध्ये आढावा घेऊन मार्गदर्शन केले तसेच शिक्षण , समाज कल्याण, महिला व बाल विकास, आदिवासी विकास विभाग यांचे समन्वयाने हि मोहीम यशस्वी करण्याकरिता सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना निर्देश दिले.
गृहभेटी दरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांच्या समक्ष २ वर्षापेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता तसेच गंभीर रुग्ण वगळून सर्वाना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. हत्तीरोग विरोधी गोळ्या सुरक्षित असून ते सेवन करणे हा हत्तीरोग संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय आहे. मोहीम कालावधीत किरकोळ गुंतागुंत उद्भवल्यास त्याचे व्यवस्थापनाकरिता मा. डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मा. डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शनात सर्व आरोग्य संस्थामध्ये शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आलेले आहेत. या मोहिमेची संपूर्ण तयारी झालेली असून मोहीम राबविण्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिली.
Health system ready for elephant disease community drug campaign.