मीडिया वी.एन.आय :
मुबंई : राज्यात ढगाळ हवामान आणि पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून तापमान ३९ अंशांच्या खाली घसरले आहे. हवामान विभागानुसार, आज (४ एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात आणि पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या काही दिवसांत तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत सरी बरसल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही वाऱ्यासह पाऊस झाला. होळीमुळे तापमान वाढेल असे वाटत असताना, काही भागांत मात्र हवामान पुन्हा ढगाळ व पावसाळी बनले आहे.
नाशिकमध्येही पाऊस पडून फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने काल येलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता, तो आजही कायम आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे ढग अजूनही कायम असून, सध्या पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra Weather: Unseasonal rains threaten the state! Yellow alert for Konkan-Vidarbha Maharashtra, what is the weather like today? Check it out..
#महाराष्ट्र #Maharashtra #weather #MediaVNI