दि. 30 एप्रिल 2025
चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतपिकांचे मोठे नुकसान.! - आमदार रामदास मसराम यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात काही दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पदरी मोठे संकट आणले आहे. विशेषतः धान आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके आडवी झाली आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे. परिणामी, या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ पुढाकार घेत जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीद्वारे बोलून पंचनामे करताना पारदर्शकता व गती राखण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळू शकेल.
शेतकऱ्यांचे हाल, शासनाची तातडीने मदतीची अपेक्षा
चैत्र महिन्याच्या शेवटी आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत. विशेषतः कर्ज घेऊन पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार मसराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांनी धीर सोडू नये. आम्ही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून योग्य त्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करत आहोत. पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर केला जाईल."
नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढतोय, दीर्घकालीन उपायांची गरज
गडचिरोली सह विदर्भातील अनेक भागांमध्ये दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणीही आमदार रामदास मसराम कडून होत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिक विमा, जलसंधारण आणि शेतीसंबंधीच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.
Due to cyclone and unseasonal rains, heavy damage to crops in Armori assembly area!
- MLA Ramdas Masram's immediate Panchnama order.!
#Gadchiroli #Armori #MLA #MediaVNI