MEDIA VNI
गडचिरोली : आणखी एका शाळेत विद्यार्थिनींची शिक्षकांकडून छेडछाड,ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल.!
मीडिया वी.एन.आय:
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दोन शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींची छेड काढल्याची प्रकरणे गाजत असतानाच ९ एप्रिलला अहेरी तालुक्यातूनही घृणास्पद घटना समोर आली आहे.
एका आश्रमशाळेत सातवी व आठवीत शिकणाऱ्या दोन आदिवासी विद्यार्थिनींची दोन शिक्षकांनी छेड काढल्याप्रकरणी रेपनपल्ली ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला.
श्याम पांडुरंग धाईत (५४) व दिलीपकुमार भिवाजी राऊत (५६) अशी त्या शिक्षकांची नावे आहेत. अहेरी तालुक्यातील एका दुर्गम गावातील आश्रमशाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या फिर्यादीनुसार, २८ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता वर्गशिक्षक श्याम धाईत हे गुणाकार शिकवत होते, मी पहिल्या बाकड्यावर मैत्रिणीसह बसले होते. मात्र, नंतर शिक्षक धाईत यांनी मला बाजूला असलेल्या बाकड्यावर बसायला सांगितले. त्यानंतर ते माझ्या बाकड्यासमोर खुर्ची घेऊन बसले व 'बॅड टच' केला. यापूर्वीही त्यांनी छेड काढली होती, असा आरोप पीडितेने ठेवला आहे. याशिवाय सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने १५ दिवसांपूर्वी वर्गशिक्षक दिलीपकुमार राऊत यांनी पाणी आणून देण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे. या दोघींनी ३० मार्च रोजी प्राचार्य व अधीक्षिका यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर फोनवरुन घरीही कळविले. ८ एप्रिल रोजी पीडितेच्या फिर्यादीवरुन रेपनपल्ली ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५ (१)३५१, सहकलम १२ पोक्सो, सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), (डब्ल्यू ), ३ (२) अन्वये गुन्हा नोंद झाला.
शाळेतून काढण्याची धमकी
पीडित विद्यार्थिनीला दबावात घेऊन संबंधित शिक्षकाने 'कोणाला काही माहिती दिली तर शाळेतून काढून टाकू ' ,अशी धमकी दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे. अखेर ८ रोजी कुटुंबीयासह दोन्ही विद्यार्थिनींनी रेपनपल्ली ठाणे गाठून आपबिती सांगितली.
महिनाभरात तिसरी घटना
दक्षिण गडचिरोलीत विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे महिनाभरातील हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी ५ मार्च रोजी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावात जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाने चार विद्यार्थिनींशी अश्लाघ्य कृत्य केले होते, त्यानंतर भामरागड शहरातील समूह शाळेत मुख्याध्यापक मालू नाेगो विडपी या मुख्याध्यापकाने तिसरी, चौथी व पाचवीत शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींची छेड काढल्याचे प्रकरण ११ मार्च रोजी उजेडात आले होते. आता अहेरी तालुक्यात दोन विद्यार्थिनींवरही असाच प्रसंग ओढावला, त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Gadchiroli: In another school, girl students were molested by teachers, a case was filed under atrocity.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI