दि. 18 नोव्हेंबर 2025
गडचिरोली नगराध्यक्ष पदाकरिता अखेर भाजपकडून प्रणोती निंभोरकर (भांडेकर) यांनाच उमेदवारी.!
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तिन्ही नगर परीषदांच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार (ता. १७) उमेदवार, समर्थक व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली. मागील काही दिवसांपासून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रचंड चुरस दिसून येत होती. पण पक्षातील सगळे प्रतिस्पर्धी अलगद बाजुला सारत प्रणोती सागर निंभोरकर ( भांडेकर ) यांनी बाजी मारली असून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला.गडचिरोली जिल्ह्यातील तीनपैकी सर्वाधिक लक्षवेधक असलेल्या गडचिरोली निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून प्रणोती सागर निंभोरकर, काॅंग्रेसकडून कविता पोरेड्डीवार व राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) – शिवसेना (शिंदे) च्या वतीने अश्विनी नैताम खोब्रागडे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले नव्हते. पण अखेरच्या दिवशी भव्य मिरवणुका काढत नगर परीषदेत येऊन नामांकन अर्ज भरण्यात आले. गडचिरोली शहरात भाजप, काॅंग्रे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) – शिवसेना (शिंदे) , परीवर्तन आघाडीच्या मिरवणुका लक्षवेधक ठरल्या. भाजपमध्ये काही महिन्यांपासून माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे व भाजपच्या जिल्हा महामंत्री गीता हिंगे यांची नावे आघाडीवर होती. पण निवडणूक तोंडावर असताना प्रणोती सागर निंभोरकर यांचा पक्ष प्रवेश होऊन त्यांचे नाव चर्चेत आले. याच दरम्यान रिना चिचघरे यांनीही आपण शर्यतीत असल्याची चाहुल दिली. त्यामुळे पहिली दोन नावे मागे पडून या दोन नावांमध्येच रस्सीखेच सुरू होती. रविवारी रिना चिचघरे यांना उमेदवारी मिळाल्याचे काहीजण ठासून सांगत होते. रात्रभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सोमवारी इच्छुक उमेदवारांसह प्रमुख नेते नामांकन भरायला गेले. त्यानंतर भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार बंटी भांगडीया यांनी थेट प्रणोती सागर निंभोरकर यांचे नाव उच्चारताच निंभोरकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. नामांकन दाखल करताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार बंटी भांगडीया, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाधक्ष रमेश बारसागडे, निरीक्षक प्रशांत वाघरे यांच्यासह पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रणोती निंभोरकर यांनी भाजपची उमेदवारी मिळवून प्रगतीचे पाऊल पुढे टाकले आहे. आता त्यांना मिळालेल्या संधीचे रूपांतर विजयात करावे लागणार आहे. त्यासाठी त्या सर्वशक्तीनिशी आणि उत्साहाने निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.