दि. 30 ऑगस्ट 2026
MEDIA VNI
गडचिरोलीत पुन्हा मातामृत्यू! आठ दिवसांत दुसऱ्या मातेचा मृत्यू; नवजात बाळानेही सोडला जीव.!
- प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू; रक्तपुरवठ्यात विलंब झाल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील मातामृत्यूच्या घटनांनी पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने नाजुका दिवाकर राऊत (२८, रा. कोजबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या नवजात बाळानेही जन्मानंतर काही वेळातच प्राण सोडले. विशेष म्हणजे, आठ दिवसांच्या कालावधीत याच रुग्णालयात झालेला हा दुसरा मातामृत्यू असल्याने खळबळ उडाली आहे.
नाजुका राऊत यांना प्रसूतीसाठी बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून २८ ऑगस्ट रोजी रात्री १.२३ वाजता गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांची सामान्य प्रसूती झाली आणि त्यांनी अडीच किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला.
यानंतर सकाळी सुमारे आठच्या सुमारास नाजुका राऊत यांना अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव वाढत गेल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. रक्तस्राव नियंत्रणात आणण्यासाठी शस्त्रक्रियेसह आवश्यक उपचार करण्यात आले. त्यानंतर रक्तस्राव थांबवून त्यांना रक्त देण्यात आले.
दुपारनंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक त्यांना झटके येण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच रात्री साडेएकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
रक्त मिळण्यास विलंब? नातेवाईकांचा गंभीर आरोप
महिलेची प्रकृती गंभीर असताना आवश्यक रक्त उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेत विलंब झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारात कथित दिरंगाई आणि आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच माता आणि नवजात बाळाचा जीव गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या दुर्दैवी घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून मृत्यूमागील नेमकी कारणे जनतेसमोर आणावीत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
आठवडाभरात दुसरी घटना; आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
याच जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी चामोर्शी येथील जिजा सातर (२६) या गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्या घटनेबाबतचे प्रश्न अद्याप कायम असतानाच आता नाजुका राऊत यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.
आठ दिवसांत दोन मातामृत्यू झाल्याने जिल्ह्यातील प्रसूती सेवा, आपत्कालीन उपचार व्यवस्था, रक्तपुरवठा आणि प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतरच्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.