दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीचा जलवा; रेला नृत्यातून आदिवासी संस्कृतीची दमदार झलक.!
- नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसह १८ युवक-युवतींचा सहभाग.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : माओवादाची छाया झुगारून शांतता, विकास आणि नव्या आशेकडे वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीने देशाच्या राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय मंचावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत दिल्ली येथे आयोजित ९व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये गडचिरोलीच्या रेला नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दिनांक ४ व ५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील ४ आत्मसमर्पित माओवादी सदस्य तसेच अनुप डान्स ग्रुपमधील १४ युवक-युवती, अशा एकूण १८ युवक-युवतींनी सहभाग घेतला.
यावेळी गडचिरोलीच्या आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या पारंपरिक रेला नृत्याचे पारंपरिक वाद्यांसह मनमोहक सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून गडचिरोलीची समृद्ध आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला आणि लोकपरंपरा राष्ट्रीय स्तरावरील मंचावर प्रभावीपणे सादर झाली. रेला नृत्याच्या माध्यमातून शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेशही देण्यात आला.
माओवादाच्या संघर्षातून शांततेच्या नव्या पर्वाकडे
गडचिरोली जिल्ह्यात माओवादाविरोधात गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माओवादापासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता केवळ संघर्षाचा जिल्हा म्हणून नव्हे, तर आदिवासी संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण आणि विकासाच्या नव्या संधींचा जिल्हा म्हणून निर्माण होत आहे.
दिल्लीतील राष्ट्रीय मंचावर रेला नृत्याचे सादरीकरण हे याच बदलत्या गडचिरोलीचे प्रभावी प्रतीक ठरले. देशातील विविध राज्यांतील मान्यवर आणि उपस्थितांच्या साक्षीने गडचिरोलीच्या युवक-युवतींनी आपल्या पारंपरिक कलेचे सादरीकरण करत जिल्ह्यासह महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशपातळीवर पोहोचवली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव
दिल्लीतील महोत्सवात सहभागी होऊन गडचिरोलीच्या संस्कृतीचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व युवक-युवती आणि आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा ८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहभागी सदस्यांना यावेळी रोख बक्षिसे देऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, माओवादविरोधातील चार दशकांच्या संघर्षानंतर गडचिरोली जिल्हा माओवादापासून मुक्त होत देशपातळीवर आपली नवी ओळख निर्माण करीत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रथमच दिल्लीतील नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये गडचिरोलीच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे आणि पारंपरिक नृत्यकलेचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली.
देशातील विविध राज्यांतील मान्यवर मंत्री आणि उपस्थितांच्या साक्षीने सादर करण्यात आलेले रेला नृत्य हे गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची प्रभावी ओळख ठरले. उत्कृष्ट सादरीकरणातून सहभागी युवक-युवतींनी उपस्थितांची मने जिंकत गडचिरोलीसह महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केल्याचे त्यांनी नमूद केले.
आत्मसमर्पित सदस्यांनी मानले पोलीस दलाचे आभार
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अतिदुर्गम गडचिरोलीतून देशाची राजधानी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रीय स्तरावरील मंचावर पारंपरिक रेला नृत्य सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहाशी जोडणे, दुर्गम भागातील युवक-युवतींना नवी संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे, या उद्देशाने ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना या सहभागामुळे अधिक बळ मिळाले आहे.
दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर घुमलेला गडचिरोलीचा रेला केवळ एक नृत्य सादरीकरण नव्हते; तर तो बदलत्या गडचिरोलीचा, आदिवासी अस्मितेचा आणि शांततेच्या नव्या पर्वाचा बुलंद सांस्कृतिक संदेश ठरला.
Gadchiroli shines on the national stage in Delhi; a powerful glimpse of tribal culture through the Rela dance! - Participation of 18 youths—including surrendered Maoist members—in the North-East Student Festival!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI #Delhi
