गडचिरोलीच्या शाळांना निधीची कमतरता भासू देणार नाही; शिक्षणमंत्र्यांची मोठी ग्वाही! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोलीच्या शाळांना निधीची कमतरता भासू देणार नाही; शिक्षणमंत्र्यांची मोठी ग्वाही!

दि. 10 सप्टेंबर 2026 

MEDIA VNI 

गडचिरोलीच्या शाळांना निधीची कमतरता भासू देणार नाही; शिक्षणमंत्र्यांची मोठी ग्वाही!

- गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत राष्ट्रभक्ती व मूल्यसंस्कारांवर भर; ‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून शिक्षणमंत्र्यांचा शाळांमध्ये थेट संवाद.! 

मीडिया वी.एन.आय : 

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील शाळांच्या विकासाला शासनाकडून अधिक बळ दिले जाणार असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठोस ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी गडचिरोलीत दिली.

केवळ पुस्तकी ज्ञान देऊन शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच राष्ट्रभक्ती, संस्कार, सामाजिक जाणीव आणि चांगल्या मूल्यांची शिदोरी देणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयींची पाहणी केल्यानंतर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगारे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

‘ज्ञानमंदिर’ म्हणून शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवा

गावातील मंदिराच्या विकासासाठी ज्या पद्धतीने संपूर्ण गाव एकत्र येते, त्याच भावनेने शाळेलाही ज्ञानमंदिर मानून तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.

गडचिरोलीच्या दुर्गम भागात अनेक शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

धोकादायक शाळा इमारतींचे तातडीने निर्लेखन करा

शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पुरेशा वर्गखोल्या, क्रीडांगण, ई-लॅब आणि वाचनालय यांसारख्या मूलभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले.

शाळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती, CSR आणि मानव विकास मिशन यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा परिसरातील जीर्ण, निरुपयोगी आणि धोकादायक जुन्या इमारतींचे तातडीने निर्लेखन करावे. आवश्यक त्या ठिकाणी नवीन इमारतींसाठी प्रस्ताव व आराखडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

शिक्षक भरतीला गती; केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. लवकरच रिक्त पदांवर शिक्षक रुजू होतील आणि त्यामुळे शिक्षकांची कमतरता कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती भुसे यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यावरही शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद; शाळांची प्रत्यक्ष पाहणी

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्र्यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरमोरी रोडवरील प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, गोगाव येथील श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक ISO आदर्श शाळा बोदली या शाळांना भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी शाळेत काय शिकवले जाते, शिक्षकांची अध्यापन पद्धती कशी आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि आणखी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याची माहिती घेतली.

रामनगर शाळेत विद्यार्थ्यांचे कौतुक

पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे वाचन आणि कविता गायन ऐकून शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गोगावमध्ये वृक्षारोपण

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव येथे शिक्षणमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेत स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांचीही पाहणी केली.

बोदलीत विद्यार्थ्यांसोबत पोळ्याचा आनंद

बोदली येथील ISO आदर्श शाळेत विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा करत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली.

यावेळी डिजिटल वर्ग आणि संगणक लॅबची पाहणी करून नादुरुस्त पॅनेल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळा व्यवस्थापनाने मांडलेल्या वॉल कंपाउंड, शेड आणि पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनासंबंधी मागण्यांवर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि आदर्श शिक्षकांचा गौरव

सामाजिक न्याय भवनातील कार्यक्रमात विविध परीक्षा, विज्ञान, क्रीडा आणि अन्य स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ISRO भेटीपासून विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील चमकदार कामगिरी

बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे शैक्षणिक भेट देणाऱ्या मोहुर्ली मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनी सन्ना शकील पठाण हिने ISRO भेटीसह आपल्या पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव सांगितला.

‘इन्स्पायर अवॉर्ड’मध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करणाऱ्या देसाईगंज येथील आदर्श इंग्लिश हायस्कूलच्या ध्रुव विनोद कोवे याचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्य विज्ञान मेळाव्यात द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या नमन पेदापल्लीवार याचाही गौरव करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या आभा संग्रामे, ध्रुव हलामी, श्रवण उसेंडी, सार्थक गेडाम, वनिता पुंगाटी यांच्यासह सलोनी करपे, वंशिका झंझाळ, कृष्णा नेरकर, रोशन काटवे आणि रमेश बन्सी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

NMMS, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

NMMS परीक्षेत यश संपादन करणाऱ्या वैष्णवी राऊत, स्वीटी उसेंडी, कृतिका गुरुनुले आणि प्रांजल भोयर यांच्यासह नवोदय व विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पूर्वा विनोद मडावी आणि श्वेता वासुदेव गेडाम यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

‘आयडॉल शिक्षकां’नाही सन्मान

विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. दिलीप नाकाडे, मंगरमेंढा शाळेचे प्रवीण दोर्लीकर यांच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील व तंत्रस्नेही ‘आयडॉल शिक्षकांना’ शाल आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षणाचा दर्जा, सुविधा आणि संस्कार यांचा संगम साधत गडचिरोलीतील शाळांना सक्षम करण्याचा शासनाचा निर्धार या दौऱ्यातून स्पष्ट झाला.

#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->