दि. 16 ऑक्टोंबर 2026
जेएसडब्ल्यूच्या लोह प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध; चामोर्शीत १४ गावांतील शेतकरी रस्त्यावर, सलग दुसऱ्या दिवशी चक्काजाम सुरूच.!- महिलांचा रस्त्यावरच मुक्काम; आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्या, मगच पुढील प्रक्रिया करा – शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली / चामोर्शी:
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीमार्फत प्रस्तावित असलेल्या पोलाद (लोह) प्रकल्पासाठी शेतजमीन अधिग्रहीत करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एमआयडीसीमार्फत सुरू असलेल्या या भूसंपादनाविरोधात परिसरातील १४ गावांतील शेकडो महिला व पुरुष शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपासून चामोर्शीच्या मुख्य चौकात बेमुदत चक्काजाम आंदोलन छेडले असून आज सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन अधिक आक्रमक झाले आहे.
आश्वासनांचा भंग; शेतकऱ्यांचा संताप अनावर..
सुमारे चार महिन्यांपूर्वी या प्रस्तावित जमीन अधिग्रणाविरोधात भेंडाळा आणि परिसरातील १४ गावांतील हजारो शेतकऱ्यांनी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले होते. त्या वेळी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी केली होती. शेतकऱ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली होती, तसेच थेट मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचे ठोस आश्वासन दिले गेले होते.
परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. एवढेच नव्हे, तर बैठकीविनाच प्रशासनाकडून शेतकऱ्यांना थेट सुनावणीसंदर्भात पुन्हा नोटिसा धाडण्यात आल्या. शासनाने दिलेल्या शब्दाचा भंग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, त्याचाच भडका आता चामोर्शीत उडाला आहे.
रस्त्यावरच चूल आणि मुक्काम..
१५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या चक्काजाम आंदोलनात परिसरातील १४ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्या महिला आणि पुरुषांनी आंदोलनाच्या पहिल्या रात्री रस्त्यालगतच चूल मांडून स्वयंपाक केला, तेथेच जेवण केले आणि संपूर्ण रात्र रस्त्यावरच जागून काढली. आज दुसऱ्या दिवशीही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून, "आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करा, तोपर्यंत कोणतीही अधिग्रहण प्रक्रिया पुढे सरकणार नाही," असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
वाहतूक ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल!
गेल्या दोन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या या तीव्र चक्काजाम आंदोलनामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून मालवाहतूक ठप्प झाली आहे. सामान्य प्रवासी, रुग्णवाहिका, दैनंदिन पोटापाण्यासाठी नोकरी-धंद्यानिमित्त प्रवास करणारा सामान्य कष्टकरी वर्ग 'चाकरमानी'. यांना मोठी गैरसोय होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतली भेट
दरम्यान, आज सकाळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी चामोर्शी येथील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या समजून घेतल्या. दुसरीकडे महसूल व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, "आमची सुपीक शेतजमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही," असा ठाम आणि एकमुखी निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
दोन दिवसांपासून मुख्य चौकात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण तापले असून आता शासन आणि जिल्हा प्रशासन यावर तत्काळ काय भूमिका घेते आणि मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक कधी आयोजित करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Farmers fiercely oppose JSW’s iron project; in Chamorshi, farmers from 14 villages have taken to the streets, continuing their road blockade for the second consecutive day!
#गडचिरोली #चामोर्शी #Gadchiroli #Chamorshi #Maharashtra #MediaVNI #JSW