दि. ११ फेब्रुवारी २०२३
स्वातंत्र्य ,समता, बंधुता ही गतिमान तत्वे आहेत; डॉ. उमेश बगाडे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. ही संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही गतिमान तत्त्वे आहेत. हिंदू कोड बिल, स्त्रियांचे अधिकार, समाज बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्या लोकशाही कल्पनेत दिसून येते. असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद डॉ. उमेश बगाडे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या आंबेडकर विचारधारा केंद्रा व्दारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर दृष्टिक्षेप.. या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम विद्यापीठ सभागृहात 'दि.१० फेब्रुवारी' आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मुख्य अतिथी म्हणून प्र-कुलगुरू,डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आणि डॉ. आंबेडकर विचारधारा केंद्राच्या समन्वयक डॉ.प्रीती पाटील उपस्थित होत्या.
गोंडवाना विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी स्वातंत्रता, समता ,जातीव्यवस्था यावर प्रकाश टाकला.तसेच या व्याख्यानाच्या कार्यक्रमातून बोध घ्यावा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.रूपाली अलोणे तर आभार प्रा.गौरी ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ.प्रीती पाटील, डॉ. संतोष सुरडकर, यांनी परिश्रम घेतले.