दि.२५.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
गडचिरोली: आरमोरी-देसाईगंज मार्गावर ४ बछड्यांसह वाघिणीचे दर्शन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मागील एक-दीड महिन्यापासून गडचिरोली आणि वडसा वनविभागात वाघांची दहशत कमी झाली असताना शुक्रवारी (दि. २४) रात्री एक वाघीण आपल्या चार बछड्यांसह आरमोरी-देसाईगंज रस्ता ओलांडताना दिसल्याने पुन्हा नागरिक भयभीत झाले आहेत.
गडचिरोली आणि वडसा वनविभागाच्या काही भागात मागील दीड -एक वर्षापासून वाघांची दहशत आहे. या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात जवळपास २५ हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. एकट्या सीटी-१ या वाघाने ११ नागरिकांचा बळी घेतल्यानंतर अडीच महिन्यांपूर्वी त्याला देसाईगंजच्या जंगलातून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर टी-६ या वाघिणीची दहशत होती. परंतु मागील एक-दीड महिन्यांपासून वाघांचे हल्ले थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, काल रात्री आरमोरी-देसाईगंज मार्गावर एक वाघीण आपल्या चार बछड्यांसह रस्ता ओलांडताना दिसली. त्याक्षणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
या संदर्भात आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम यांना विचारणा केली असता, वाघीण रस्ता ओलांडत असतानाचे ठिकाण नेमके कुठले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आरमोरी वनपरिक्षेत्रात टी-२ वाघीण असून तिला चार बछडे असल्याचे त्यांनी सांगितले.