दि.०३.०३.२०२३
Vidarbha News India - VNI
एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी - अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.
यामुळे दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
एटापल्ली तालुक्यात मागील काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावर सुरू आलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी उभे असलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यात १ जेसीबी,१ पोकलॅन आणि १ मिक्सरमशीनचा समावेश आहे. यावेळी १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातील विसामुंडी मार्गावर देखील एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.