दि. १६.०६.२०२३
MEDIA VNI
भारतात टॅलेंटला कमीच नाही! आग विझविण्याच्या फायरबॉलला मिळालं पेटंट
मीडिया वी. एन.आय :
छत्रपती संभाजीनगर : घर, कार्यालये, गोदामे, दुकाने, औद्योगिक वसाहती, वाहने अशा अनेक ठिकाणी दरवर्षी आगीच्या घटना घडतात. अशा आगीच्या घटना घडल्या तर वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील आशुतोष भट्टड यांनी संशोधन करुन 'फायर बॉल एक्सटिंग्युशर प्रा. लि.' नावाने स्टार्ट अप सुरु केले आहे.
त्यांनी तयार केलेल्या एक आणि दोन किलोमधील फायर बॉलचा आग विझविण्यासाठी वापर करता येतो. एक बॉल बारा बाय बार स्वेअर फुटातील आग आटोक्यात आणतो. आग विझविण्यासाठी त्यांनी संशोधन करुन विकसित केलेल्या फॉयरबॉलमधील केमिकला पेटंट मिळाले आहे.
त्यांच्याकडील फायर बॉल भारतात सर्व शासकीय कार्यालये तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सोबत आफ्रीका आणि युरोपीयन राष्ट्रात विक्री होत आहे.
लॉकडाऊन मध्ये दिले मुर्त रुप
आशुतोष भट्टड यांचे देवगिरी महाविद्यालयात बी. कॉम सीडब्ल्युएचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये लंडन येथील साऊथ बँक युनिव्हर्सिटीतून एमबीएचे शिक्षण पुर्ण केले. त्यांची स्वतःची ऑटोमोबाईल कंपोनंटची कंपनी आहे. शिक्षणानंतर त्यांनी स्वतःच्या कंपनीकडे लक्ष देण्याची ठरविले. सन २०२० मध्ये ते जर्मनीत ऑटोमोबाईल कंपोनंट एक्सोच्या बैठकीसाठी गेले होते.
तेथे त्यांनी चायनीज बनावटीचे फायरबॉल बघितले. या अगोदर अशा प्रकारचे फायरबॉल त्यांनी भारतात बघितले नव्हते. मात्र यामध्ये त्यांना अनेक त्रुटी असल्याचे जाणवले. जर्मनीतून परत आल्यावर लॉकडाऊन लागला होता. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपोनंटचे काम काहीसे संथ गतीने सुरु होते.
या दरम्यानच्या काळात त्यांनी देशी बनावटीच्या फायर बॉलवर संशोधन केले. त्यामधील तांत्रिक त्रुटींचा अभ्यास केला. यासाठी आयआयटी पाटणा येथील प्राध्यापकाची त्यांनी यासाठी मदत घेतली. त्यांना ही कल्पना सांगून त्यांच्यासोबत करार केला. त्यानंतर त्यांनी २२ ऑगस्ट २०२० मध्ये 'फायर बॉल एक्सटिंग्युशर' लॉन्च करुन स्वतःचे स्टार्टअप सुरु केले.
फायर बॉल मध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल केले विकसित
फायरबॉल तयार केल्यानंतर त्यांची अनेक ठिकाणी चाचणी केली. त्याचे विविध ठिकाणी डेमो घेतले. फायरबॉल तयार करताना त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल तयार केले. संशोधन करुन तयार केलेल्या त्यांच्या केमिकलला पेटंट मिळाले आहे.
फायरबॉलमधील हे केमिकल कोणत्याही प्रकारची आग विझवू शकते. हे फायर बॉल एक आणि दोन किलोमध्ये तयार केले आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल असून त्याच्या चारही बाजूने सेन्सर आहे. या फायरबॉलला आगीचा स्पर्श झाला तरी हा बॉल आपोआप फुटतो. बॉल फुटल्यावर त्यामधील केमिकल बारा बाय बारा स्वेअर फुट परिसरातील आग विझते. आग जर मोठी असेल तर यासाठी अनेक फायरबॉलचा उपयोग करुन ती आग आटोक्यात आणली जाते.
देश विदेशात फायर बॉलची विक्री
आशुतोष भट्टड यांनी यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील वाळुज येथे प्लांट उभारला आहे. त्याचे वाळुज येथे उत्पादन होते. आतापर्यंत देशभरात त्यांचे जवळपास २२० डिस्टीब्युटर्स झाले आहे. मागील एक वर्षापासून ते आफ्रीकी राष्ट्रात फायर बॉलची विक्री करत आहे. तर मागील दोन महिन्यांपासून युरोपीयन राष्ट्रात सुद्धा फायर बॉल विक्रीसाठी पाठविले जात आहे. लवकरच मध्य आशियायी राष्ट्रात सुद्धा हे फायर बॉल विक्रीसाठी जाणार आहे.