दि. 06.09.2023
गोंडवाना विद्यापीठाच्या बिझनेस लॅब तर्फे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता तयार करण्यासाठी विद्यापीठाची बिझनेस लॅब: - डॉ.श्रीराम कावळे
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : अनेक लोकांना रोजगारामध्ये अपयश आलेले असेल तर खचून जाऊ नये उद्योगाची कास आपण धरली तर अनेक लोकांना आपण काम देऊ शकतो. येथील विद्यार्थ्यांना उद्योजकीय मानसिकता तयार करण्यासाठी विद्यापीठाची बिझनेस लॅब आहे. ही बिझनेस लॅब सलंग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांना नॉलेज आणि स्किल देण्यासाठी बिजनेस लॅब मदत करेल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांनी यावेळी केले.
बिजनेस लॅब पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 'उद्योजकीय मानसिकतेचा विकास' यावर विषयावर एकदिवस कार्यशाळा गोंडवाना विद्यापीठात आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे , वाणिज्य विभाग प्रमुख उत्तमचंद कांबळे, वक्ता म्हणून प्रा डॉ अनिरुध्द गचके, आरसिटी. बँक ऑफ इंडियाचे समन्वयक हेमंत मेश्राम, उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र पुनम कुसराम, खादी ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम यांची उपस्थिती होती.
रोजगार मागणाऱ्या पेक्षा रोजगार देणारे बना:डॉ.अनिल हिरेखण
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मुलांना नोकरी मिळावी यासाठी आपण सगळेच धडपडतो पण एम सी इ डी यांच्या सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केलेला आहे . तो या उद्योजकीय मानसिकतेची निगडित आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये फार मोठा मेळावा या संदर्भातला होणार आहे आणि या मेळाव्यानंतर विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क ट्रेनिंग आयोजित करण्यात येईल. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. आपण रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे बनायला हवे असे विचार डॉ. अनिल हिरेखण यांनी यावेळी व्यक्त केले.
यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...
'उद्योजक होणे काळाची गरज' या विषयावर अनिरुद्ध गचके 'उद्योजक सक्षमता' या विषयावर आरसीटी बँक ऑफ इंडियाचे समन्वयक हेमंत मेश्राम, 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' जिल्हा उद्योग केंद्र उद्योग निरीक्षक पूनम कुसराम , 'प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' या विषयावर खादी ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम आणि 'महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत' सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र योगेंद्र शेंडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र स्टुडंट इंनोवेशन चॅलेंज या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना मूर्त स्वरूप देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचं योगेंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
यावेळी केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालय चामोर्शी यांनी महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंजर्स स्पर्धेत ११७ संकल्पनांची नोंदणी केल्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला यासाठी या महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उत्तमचंद कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.