दि.19.09.2023
MEDIA VNI
INDIA : इंडिया आघाडीमध्ये 'या' मोठ्या पक्षाचा समावेश होण्याची शक्यता; प्रियांका गांधींसोबत झाली चर्चा
मीडिया वी.एन.आय :
दिल्ली : विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये बसपाचा समावेश होण्याची शक्यता आहे. मायावती आणि प्रियांका गांधी यांची भेट झाल्याने पाच राज्यांमधील निवडणुकांनंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा होईल, असं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी इंडिया आघाडी ताकदीने प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. बहुजन समाज पार्टीला इंडिया आघाडीच्या सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वीदेखील अनेक बैठका झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.
काँग्रेच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत मायावतींची बोलणी सुरु आहे. मात्र अद्याप त्यांच्यामधली बोलणी निर्णयाप्रत पोहोचलेली नाही. यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा-काँग्रेस आघाडी ठरलेली असतानाही विघ्न आलेलं होतं. विधानसभेच्या १२५ जागांवर काँग्रेस आणि उर्वरित २७८ जागांवर बसपा लढेल, असं ठरलेलं. यासंबंधीच्या बातम्या बाहेर आल्यानंतर सगळंच फिस्कटलं.
मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वीच बसपाचा इंडिया आघाडीमध्ये समावेश होईल, अशी शक्यता आहे. कारण बसपाला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसने तयारी केल्याचं दिसून येत आहे. कारण बसपाकडे अजूनही आपली १० ते १२ टक्के मतदारांची बँक आहे.
एकीकडे इंडिया आघाडीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे आघाडीतील पक्षांमध्ये बेबनाव असल्याचं दिसून येत आहे. पत्रकारांवर बहिष्कार टाकणारा निर्णय आपल्याला माहिती नसून मी पत्रकारांच्या बाजूने असल्याचं नितीश कुमार म्हणाले होते. त्यामुळे आघाडी पुढे-पुढे कशी जाते हे पाहाणं महत्त्वाचं आहे.