दि. 24.10.2023
MEDIA VNI
'निळावंती' ती येतिय... या रहस्यमय चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित.!
मीडिया वी.एन.आय
मुंबई : चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. आता 'निळावंती' या रहस्यमय चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक चित्रपट असल्याचे लक्षात येतेय.
'निळावंती' हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे. हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून 'निळावंती' राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.
लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना `निळावंती` ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे.