दि. 25.10.2023
वीर बाबुराव शेडमाके स्मृती दिनानिमित्य गोंडवाना विद्यापीठात व्याख्यान संपन्न !
- वीर बाबुराव शेडमाके यांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी : सुजाता मडावी
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : स्वांतत्र लढ्यात आदिवासींचे योगदान मोठे आहे. अभ्यासक्रमात आदिवासीचा इतिहास येणे आवश्यक आहे. वीर बाबुराव शेडमाके यांचे संघटन, व्यवस्थापन कौशल्य अत्यंत महत्वाचे होते. ते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हातील स्वातंत्रलढ्यातील थोर क्रांतिकारक होते. त्यांनी स्वातंत्र लढयात इंग्रजाशी सामना करून इंग्रजांना सळो कि पडो करून सोडले होते. आपल्या बुद्धीचातुर्य व पराक्रमाने या परिसरात त्या काळी इंग्रजामध्ये दबदबा तयार केला होता. त्यांचे कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन गोंदिया येथील महिला व बालविकास अधिकारी सुजाता मडावी यांनी केले.
१८५७ च्या उठावातील थोर क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीदिना निमित्त गोंडवाना विद्यापीठा च्या आदिवासी अध्यासन केंद्राच्या वतीने ' आदिवासी गौरव - वीर बाबुराव शेडमाके ' या विषयावर एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठ सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणुन बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी आदी उपस्थित होते. व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, आदिवासींमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. त्यांच्या पर्यंत ते पोहचविणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमातुन वीर क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्यात असलेली देशप्रेमाची भावना आपल्यातही सतत तेवत असावी. असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सा. प्रा.डॉ. नरेश मडावी , संचालन सा. प्रा. गावस्कर तर आभार प्रविण गिरडकर यांनी मानले.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक स्मृतीदिन समिती सा. प्रा.डॉ. नंदकिशोर मने यांनी परिश्रम घेतले.