दि. 20.10.2023
MEDIA VNI
कौशल्य विकास प्रशिक्षणातून युवकांना मोठी संधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
मीडिया वी.एन.आय :
मुंबई : कौशल्य विकास प्रशिक्षणातून देशातील युवकांच्या जीवनात नवी पहाट येत असून महिला, दलित, वंचित आणि मागास घटकांना सन्मान आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याची संधी मिळत आहे. आता ड्रोनद्वारेही आधुनिक शेती करता येत आहे.
विकसित भारत घडविण्यात कौशल्य विकास प्रशिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. या दृष्टीने महाराष्ट्राची 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रां'चीयोजना महत्वाची आहे, असे गौरवोद्गारही पंतप्रधान मोदी यांनी काढले.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते. तसेच राज्यभरातील कौशल्य विकास केंद्रांच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उमेदवार आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, जगभरात भारतातील प्रशिक्षित युवकांना मागणी आहे. अनेक देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढत असून एका सव्र्हेक्षणानुसार जगभरातील १६ देशांमध्ये ४० लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे दिसून आले आहे. या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाही, तर अन्य देशांसाठीही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो.
कौशल्य विकास केंद्रे ही रोजगार मंदिरे – मुख्यमंत्री
युवा शक्ती मोठे संसाधन आहे, हे ओळखून पंतप्रधान मोदी यांनी कौशल्य विकास अभियान सुरू केले. गेल्या सहा वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशात गेल्या नऊ वर्षांत पाच हजार नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे ( आयटीआय) सुरु करण्यात आले. त्यात चार लाख उमेदवारांना प्रशिक्षण मिळत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानाचे स्वप्न साकार करू – उपमुख्यमंत्री फडणवीस
भारत महाशक्ती होण्यासाठी बदलत्या काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातही कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. मोदी यांनी दूरदृष्टीने कौशल्य विकासाच्या सुरु केलेल्या कामाचे चांगले परिणाम देशभरात दिसून येत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.