दि. 30.01.2024
MEDIA VNI
Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक, 3 जवान शहीद तर 13 जण जखमी.!
मीडिया वी.एन.आय :
सुकमा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 13 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर, तीन जवानांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे.
नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टेकुलागुडेम गावात नव्याने स्थापन केलेल्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला. त्यावेळी 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही छावणी स्थानिक जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती.
जखमी जवानांना हेलिकॉप्टरने जगदलपूर रेफरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. संघर्षग्रस्त भागातील स्थानिक समूदायाला मदत करण्यासाठी टेकुलागुडेम गावात नवीन सुरक्षा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. म्हणाले की, बस्तर पोलीस आणि तैनात सुरक्षा दले परिसरातील लोकांना नक्षल समस्येपासून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहेत. 2021 साली टेकलगुडेम चकमकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, जनहितार्थ आम्ही पुन्हा टेकलगुडेम गावात छावणी स्थापन करू आणि परिसराची शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी समर्पितपणे काम करू.
नक्षलवाद्यांनी तिन्ही बाजूंनी हल्ला केला
सन 2021 साली टेकलगुडेम जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 23 जवान शहीद झाले होते. एप्रिल 2021 मध्ये, सुमारे 2,000 सुरक्षा कर्मचारी विजापूर जिल्ह्यात एका नक्षलवादी नेत्याचा शोध घेत होते. तेव्हा त्यांच्यापैकी काहींवर हल्ला झाला होता. सुमारे 400 ते 750 प्रशिक्षित नक्षलवाद्यांनी सैनिकांना तीन बाजूंनी घेरले आणि अनेक तास त्यांच्यावर मशीन गनने गोळीबार केला. त्यांनी प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची शस्त्रे, दारुगोळा, गणवेश आणि बूटही लुटले. सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, चकमकीत सुमारे 28-30 नक्षलवादीही मारले गेले.
Chhattisgarh: Fierce encounter between security forces and Naxalites in Chhattisgarh, 3 jawans martyred and 13 injured.