दि. 09.01.2024
Gadchiroli : गोंडवाना विद्यापीठात पत्रकार दिन साजरा.!
- समाजाच्या कल्याणासाठी पत्रकारिता करा : जेष्ठ संपादक शैलेश पांडे
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवला तर लोकतंत्र बळकट होईल, ज्या देशातील माध्यमे मजबूत असतात त्या देशात लोकशाही मजबूत असते. समाजाच्या कल्याणासाठी पत्रकारिता करा, हीच खरी बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन तरुण भारता वृत्तपत्राच्या डिजिटल आवृत्तीचे जेष्ठ संपादक आणि साहित्यिक, लेखक शैलेश पांडे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठात जनसंवाद विभागाच्या वतीने नुकताच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त मराठी पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे होते. तर कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, भारतात 2000 सालापासून अनेकांच्या हातात मोबाईल आले, यामुळं सामाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये स्थितांतर होत आहे, तीच स्थितांतर माध्यमांमध्येही आली, चॅनल्स आणि मोबाईल मध्ये अनेकजण बातम्या बघतात, मात्र, वृत्तपत्रांचं महत्व कमी झाले नाही. आजही अनेकजण सकाळी वृत्तपत्र वाचतात. चौथ्या स्तंभाचं महत्त्व बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात होतं तेवढंच आजही आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मोठं काम करू शकतो. म्हणूनच चौथ्या खांबाचे महत्व अधोरेखित होतं. चांगले पत्रकार गोंडवाना विद्यापीठातुन बाहेर पडावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शैलेश पांडे यांनी सांगितले की, मुद्रित माध्यमांची पायाभरणी तसेच पत्रकारांमध्ये चौफेर विद्वत्तेच्या परंपरेची पायाभरणी बाळशास्त्री जांभेकर यांनीच केली.
लोकशाहीच्या तीन खांबांना कायदे आहेत, मात्र चवथ्या खांब असलेल्या पत्रकारांसाठी कायदे नाही, विशेषाधिकार नाही, मात्र तरीही त्यांचे योगदान आहे, कारण ही माणसे व्रतस्थ आहेत.असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे संचालन स. प्रा. डॉ. संजय डाफ यांनी तर आभार स.प्रा. डॉ. सरफराज अन्सारी यांनी केले. प्रस्ताविक स.प्रा.रोहित कांबळे यांनी तर प्रमुख वक्ते यांचा परिचय स. प्रा.चैतन्य शिनखेडे यांनी करून दिला. यावेळी जनसंवाद विभागाच्या समन्वयिका डॉ. रजनी वाढई, स.प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Gadchiroli: Journalist's day celebrated in Gondwana University!
- Do journalism for the welfare of society : Senior Editor Shailesh Pandey