गरिबांचा 'आनंदाचा शिधा' खाणारा कोण.? बघा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गरिबांचा 'आनंदाचा शिधा' खाणारा कोण.? बघा..

दि. 15.02.2024

MEDIA VNI 

गरिबांचा 'आनंदाचा शिधा' खाणारा कोण.? बघा..

मीडिया वी.एन.आय : 

प्रतिनिधी/मुबंई : निर्लज्जपणाचा कळस जर समजून घ्यायचा असेल तर राज्यातल्या काही स्वार्थी सरकारी कर्मचार्‍यांकडे बघा. या सरकारी जमातीने गरिबांच्या वाट्याला जाणारा Anandacha Shidha 'आनंदाचा शिधा'च पळविला आहे.

या स्वार्थी सरकारी कर्मचार्‍यांची वृत्ती अतिशय किळसवाणी आहे. गरिबांच्या तोंडचा घास स्वत:च गिळंकृत करणार्‍या या सरकारी जमातीची संख्या थोडीथोडकी नाही तर चक्क लाखाच्या घरात असल्याचे उघडकीस आले आहे. कोरोना काळात आर्थिक स्थिती ढासळलेल्या परिवाराला किमान दोन घास अन्न मिळावे म्हणून स्वस्त धान्य दुकानातून मोफत स्वरूपात गरिबांना धान्य पुरविण्याची योजना सरकारने आखली. मात्र, या संधीचा फायदा घेत चक्क धान्य दुकानदार व नोकरदार वर्गाने रेशन दुकानातून धान्य उचलून गरिबांचा घास पळविला. इतकेच नाही तर या लांडग्यांनी सण-उत्सवादरम्यान गरिबांना शासनाने दिलेला 'आनंदाचा शिधा'सुद्धा उचलला. साखर, तेल, डाळ, पोहे, रवा, गहू, तांदूळ हे जिन्नस शासकीय कर्मचार्‍यांनी लाटले आहेत. लाखभर सरकारी कर्मचार्‍यांनी मोफत धान्य लाटल्याचा प्रकार उघडकीस आला असून ही बाब संपूर्ण राज्यासाठी शरमेची आहे.

या सरकारी कर्मचार्‍यांनी थेट गरिबांसाठी लागू असलेल्या योजनेतच प्रवेश मिळविला आणि त्यानंतर यातील काहींनी धान्य तर काही शासकीय कर्मचार्‍यांनी शेतकरी सन्मान धन योजनेतील हप्तेही मिळविले आहेत. असे कर्मचारी एक-दोन नाही तर चक्क लाखाच्या घरात असून अशा कर्मचार्‍यांच्या नावाची यादीच आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुळात गरिबांसाठी असलेल्या योजनेत शासकीय कर्मचार्‍यांना घुसखोरी करण्याची गरज काय, पण स्वार्थापुढे आपण काय करीत आहोत, याचे भान या स्वार्थी कर्मचार्‍यांना नाही. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रकार प्रकर्षाने पुढे आला आहे. विशेष म्हणजे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाकडे अंत्योदय योजनेचे कार्ड आहे. हेच कार्ड काही शासकीय कर्मचार्‍यांकडेसुद्धा उपलब्ध असून या कर्मचार्‍यांची संख्या 12,134 आहे. प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी गटातूनही या कर्मचार्‍यांनी धान्याची उचल केली आहे. त्यामुळे ही योजना नेमकी कुणाकरिता होती, असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा लाजिरवाणा प्रकार शासकीय कर्मचार्‍यांकडून घडला आहे. कुठल्याही कामात भ्रष्टाचार करून खिसे भरणार्‍या या जमातीची मजल आता गरिबांच्या तोंडचा घास पळविण्यापर्यंत गेली आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव नेत्रा मानकामे यांनी या कर्मचार्‍यांच्या चौकशीचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यासंदर्भात कारवाई सुरू केली असून गरिबांचे धान्य पळविणार्‍या जमातीचा शोध घेतला जात आहे. सरकारी कर्मचारीच मोफत धान्यासाठी रेशन दुकानाच्या बाहेर रांगेत उभे होते. गरिबांसाठी आलेले धान्य तर त्यांनी हडपलेच; पण त्यांच्या नावाने आलेला Anandacha Shidha आनंदाचा शिधासुद्धा लाटला. शेतकरी सन्मान धन योजनेचाही लाभ या स्वार्थी वृत्तीच्या शासकीय कर्मचार्‍यांनी घेतला. शासन गरिबांसाठी अनेक योजना आखत असते. या योजनांच्या माध्यमातून गरिबांना दोन वेळचे सुखाने खाता येईल, याची सोय शासन करीत असते. मात्र, स्वार्थी कर्मचारी आपले पोट कसे भरता येईल, याची सोय करण्याच्या तयारीत असतात. गरिबांचे धान्य उचलणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या जिल्हानिहाय बघितल्यास एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 2601 कर्मचार्‍यांनी गरिबांचे धान्य स्वत:च गिळंकृत केले आहे. सर्वाधिक कर्मचारी नाशिक जिल्ह्यातील असून या जिल्ह्यातील 5815 कर्मचार्‍यांनी गरिबांचे धान्य आपल्या घशात ओतले आहे.

Anandacha Shidha : नागपूर जिल्ह्यातील 3589, अहमदनगर 4914, अमरावती 4376, संभाजीनगर 4438, बीड 4469, पुणे 1415, चंद्रपूर 1884, वर्धा 2257, सांगली 2469, लातूर 3520, नांदेड 4428, परभणी 2052, जळगाव 3126 यासह राज्यभरातील प्रत्येकच जिल्ह्यातील काही कर्मचार्‍यांनी शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेतला आहे. एकीकडे सरकार कर्मचार्‍यांचा पगार वाढवून त्यांना महागाई भत्ते लागू करीत असते. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी विविध योजना लागू करीत असते. दुसरीकडे हेच कर्मचारी शासनाच्या योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न करता भ्रष्टाचार करून सरकारलाच पोखरण्याचे काम करीत असतात. भ्रष्टाचाराने तर संपूर्ण प्रशासन बरबटले आहेच; आता या कर्मचार्‍यांची नजर गरिबांच्या हक्काच्या धान्यावरही पोहोचली आहे. या कर्मचार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची गरज असून त्यांच्या नावाची यादी जाहीरपणे प्रसिद्ध केली पाहिजे आणि त्यांच्या पगारातून उचललेल्या धान्याचे पैसे वसूल केले पाहिजे. तरच पुढे असे गैरकृत्य करताना हे स्वार्थी कर्मचारी शंभरदा विचार करतील.

 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->