दि. 31 जुलै 2024
गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडून मार्गाची प्रचंड दुरवस्था.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.आरमोरी-गडचिरोली या जवळपास ३५ किलोमीटर असलेल्या महामार्गावर अनेक गावाजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीला खड्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. हा मार्ग जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून सतत वाहने धावत असतात. मात्र, खड्ड्यांमुळे या मार्गाची मोठी दुरवस्था झाली असल्याने खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही. खड्ड्यांत अनेक ठिकाणी गाड्या फसतात, आजारी नागरिकाला नेता येत नाही. खड्ड्यांमुळे अनेक लोकांच्या कारचे टायर फुटले आहेत. अनेक ठिकाणी लहानमोठे अपघातही या मार्गावर घडत आहेत.
पावसाळ्यापूर्वी सदर मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. रस्त्याच्या कडेला नाल्यांची सफाई केली नाही, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे रस्त्यावरून पाणीही वाहत असते. सदर मार्गावरील डांबर उखडून जात आहे. ठाणेगाव, वैरागड फाट्यापासून १०० मीटरवर रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. तसेच आरमोरी गाढवी नदी परिसरात सुद्धा मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर मार्ग हा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.
रस्ता खोदून पाईप टाकल्याने अपघात
आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाका, वसा जवळील कोलांडी नाला, देऊळगाव खोब्रागडी नदी ते डोंगरसावंगी रस्ता, डोंगरगाव जवळ इरिगेशनने रस्ता खोदून पाईप टाकले. त्यामुळे पावसाळ्यात एक मीटर खड़ा पडला. यात कार शिरल्याची घटना घडली होती. रस्ता खोदून पाईप टाकल्याने अपघाताच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.
खासदारांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना
आरमोरी-गडचिरोली या मार्गाची खड्यांमुळे ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. सदर बाबीकडे वाहनधारकांनी खा.डॉ. नामदेव किरसान यांचे लक्ष वेधले. रविवारी त्यांनी महामार्ग प्रशासनाला सूचना करून रस्त्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
मार्ग दुरुस्तीची मागणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने आरमोरी- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करून, वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष माधव गावड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
The national highway from Gadchiroli to Armori is in a very bad condition due to potholes. #गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #Armori #nationalhighway #MaharashtraNews