दि. 21 ऑगस्ट 2024
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत; ई-केवायसी पूर्ण करा : जिल्हाधिकारीमीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधीत लाभार्थींनी आपल्या गॅस एजंन्सीमध्ये संपर्क करावा, तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
अशी करा ईकेवायसी : ई-केवायसी गॅस डिस्ट्रीब्युटर शोरूममध्येही करता येइल. किंवा एच.पी. पे. ॲपवरून सेल्फ ई-केवायसी करता येते. ई-केवायसी ही एक साधी 1 मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे. ग्राहकांनी गॅस साठी बुकींग ऑनलाईन करावी. तसेच 3 सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सी मार्फत वसुल करण्यात येईल. त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडर खरेदी केल्यानंतर 3 सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खातेमध्ये सबसिडीच्या रुपात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राहय धरले जाणार नाही. त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे.
गडचिरोली जिल्हयात एकुण 23 गॅस परवानाधारक असून त्यापैकी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) -6, इंडियन ऑइल (आय.ओ.सी.एल.)-2, हिंदुस्थान पेट्रोलियम (एच.पी.सी.एल.)-15 गॅस एजन्सी कार्यरत असून ई-केवायसी प्रक्रिया पुर्णपणे मोफत आहे. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी कळविले आहे.
3 gas cylinders free annually under Chief Minister Annapurna Yojana; Complete e-KYC : Collector #महाराष्ट्र #MaharashtraNews #Gadchiroli #DM #maharashtra #marathinews