दि. 23 ऑगस्ट 2024
गोंडवाना विद्यापीठात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राचे उद्घाटन.!- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनविषयक उद्दिष्टांना मिळणार चालना.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राचे उद्घाटन मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.
या उद्घाटनावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घाटक म्हणून नागपूर येथील आर. एस. मुंडले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डाॅ. विजय राठोड तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अध्यासन केंद्रांतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे आधुनिक विचार, समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी योगदान, सामाजिक न्याय व समतेचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करणे व त्यांच्या समग्र साहित्यावर संशोधन करून युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, त्यांच्या साहित्यावर सखोल संशोधन करून नवीन संशोधनास चालना देणे हे उद्दिष्ट साकार करण्यासाठी सदर अध्यासन केंद्राची निर्मिती होत आहे.
तरी, या उद्घाटन समारंभास विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या समन्वयक डाॅ. रजनी वाढई यांनी केले आहे.