दि. 18 ऑक्टोबर 2024
दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग?, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची राजधानीकडे कूच; रात्री काय निर्णय?मीडिया वी.एन.आय :
मुबंई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये जागा वाटपाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. असं असलं तरी अजूनही काही जागांचा तिढा कायम असल्याने आता हा प्रश्न थेट दिल्ली दरबारी गेला आहे.
त्यामुळे महायुतीतील महाराष्ट्रातील तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना होत आहे. दिल्लीत आज रात्री वरिष्ठ नेत्यांसोबत या तिन्ही नेत्यांची बैठक होणार असून त्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुतीने गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाच्या चर्चा सुरू केल्या आहेत. काही जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. मात्र, अजूनही काही जागांचा तिढा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच महायुतीचे नेते आज दिल्लीत जाऊन हा तिढा सोडवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीकडे जाणार आहेत. आज रात्री या तिन्ही नेत्यांची भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याशी चर्चा होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच ज्या जागांचा तिढा आहे, त्यावरही आजच तोडगा काढला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तिकीट वाटप लवकर होणार?
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते, आमदार, माजी आमदार तिकीट मिळण्याची वाट पाहत आहेत. काही इच्छुकांनी तर तिकीट मिळत नसल्याचा अंदाज घेऊन महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जेवढ्या उशिरापर्यंत उमेदवारी घोषित होईल तेवढा कमी वेळ उमेदवारांना मिळणार आहे. तसेच इच्छुकांचा हिरमोडही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट वाटप लवकरात लवकर करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काही जागांची अदलाबदली
महायुतीमध्ये काही जागांची अदलाबदली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यावर महायुतीचं यापूर्वीच एकमत झालं आहे. एखाद्या मतदारसंघातील विद्यमान आमदाराचा परफॉर्मन्स चांगला नसेल आणि युतीतील एखाद्या पक्षाकडे त्याच जागेसाठीचा तुल्यबळ उमेदवार असेल तर अशावेळी विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या शिवाय भाजपही विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व मुद्द्यांवर अमित शाह यांच्याशी चर्चा होऊ शकते, असा कयास वर्तवला जात आहे.
सभा आणि प्रचार
आज बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांच्या महाराष्ट्रातील सभांबद्दल चर्चा होऊ शकते. प्रचाराचं नियोजन कसं असावं, यावरही बैठकीत भर दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Velocity for big events in Delhi?, Shinde, Fadnavis and Ajit Dada march to the capital; What night decision? #Delhi #Maharashtra #Vidhansabha #election