दि. 25 नोव्हेंबर 2024
Maharashtra Politics : मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी होणार? नवी तारीख आणि नवी माहिती आली समोर..मीडिया वी.एन.आय :
मुबंई : विधानसभा निवडणूक निकालानंतर आता राज्याचा कारभार कोण चालवणार? कोण होणार राज्याचे मुख्यमंत्री? याबाबतची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेसह अवघ्या देशाला आहे.
त्याचवेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार, कधी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आणि शपथविधी कधी होणार याबाबतची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट दिसली. या लाटेचा तडाखा महाविकास आघाडीला बसला. महायुतीचे २३० आमदार निवडून आले. तर महाविकास आघाडीचे अवघे ४६ आमदार निवडून आले. त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे फक्त २० आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत.
आता सरकार महायुतीचं असणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कोण असणार असा पेच महायुतीसमोर आहे. कारण एकट्या भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत आजच शिक्कामोर्तब
विधानसभा निवडणुकीत 'न भूतो न भविष्यति...' यश मिळवलं आहे. भाजपनंही रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी तर हा मोठा विजय आहे, असे बोलले जात आहे. पण आता राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल? पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील की देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, याबाबत अनेक प्रश्न आणि तुफान चर्चा सुरू आहेत. त्यात आता नवी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत आजच शिक्कामोर्तब होईल. दिल्लीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तिन्हीही प्रमुख नेते अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत या पेचावर तोडगा काढतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
दिल्ली दौऱ्यानंतरच 'फिक्स' होणार
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाची शर्यत अटातटीची झाली आहे. शिंदेंकडेच महाराष्ट्राचं नेतृत्व असणार की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी सोपवतील, याबाबत मोठा यक्षप्रश्न आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका, खल सुरू आहे. त्याचवेळी याबाबत नवी माहिती समोर आली आहे. तिन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले जाते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री याबाबतच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांचा शपथविधी येत्या २९ नोव्हेंबरला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी होतील. त्यानंतर मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. याशिवाय यासंदर्भात अडचणी निर्माण होतील अशा कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचनाच युतीमधील सर्व विजयी उमेदवारांना दिल्या आहेत. विजय आणि जल्लोषात वाद होईल असं काहीही बोलू नये, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
Maharashtra Politics : Who is the Chief Minister and when will the swearing-in ceremony take place? New date and new information has come out..