दि. 30 डिसेंबर 2024
आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज; - संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ - जिल्हा यंत्रणेचा आढावा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची व तत्परतेने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याला नव्या दमाचे लाभलेल्या अधिकाऱ्यांच्या टीमवर्क मुळे ही बाब लवकरच शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी यांनी आज व्यक्त केला.
आकांशीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज विविध शासकीय विभागाच्या प्रमुखाचा जिल्हा नियोजन भवन येथे आढावा घेतला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल, खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, आमदार मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय सेठ यांनी शिक्षणावर भर देतांना जिल्ह्यातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मध्यान्ह भोजन योजना यावर माहिती घेतली. जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले, कृषी विभागाचा आढावा घेतांना जिल्ह्यात प्रमुख पिके कोणती, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची काय सुविधा आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल, किसान क्रेडिट कार्ड किती वाटप केले, किसान सन्मान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना दिला, लाभ वाटपात काही अडचण आहे का याबाबत त्यांनी विचारणा केली. शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत व अधिक काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांनी विचारणा करून जिल्ह्याला आकांशीत जिल्ह्याच्या यादीतून काढण्यासाठी शासनाकडून काय मदत हवी आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले. ही माहिती प्रधानमंत्री कार्यालयात सादर करण्यात येणार असून त्यामुळे जिल्ह्याला भरीव मदत उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. जलजीवन मिशन योजनेंतर्गत ९२ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबददल त्यांनी कौतुक करत उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याची सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
यावेळी खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम आमदार मिलिंद नरोटे यांनी राज्यमंत्री संजय सेठ याचेसमक्ष जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले.
त्यानंतर संजय सेठ यांनी गोंडवाना विद्यापीठ येथील प्रशिक्षण केंद्र व एकल सेंटरला भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच कोटकल ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात विविध योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी कोटगल बॅरेजला भेट देवून तेथील कामाचीही पाहणी केली. सेठ यांनी आज सकाळी विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, रामदास मसराम, डॉ. मिलींद नरोटे यांचेशी जिल्ह्याील विकास कामांवर चर्चा केली.
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
Need for a concerted effort to move out of the list of aspirational districts; - Minister of State for Defense Sanjay Seth
- A review of the district system.!