दि. 07 डिसेंबर 2024
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात २५ वर्षीय गर्भवती महिला ठार.! - महिलेचे शव उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले.
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चातगाव बीट मधील जुमगाव मोड रा. कुरखेडा लगतच्या जंगलाला लागून असलेल्या शेतात काम करीत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ६ डिसेंबर ला दुपारच्या सुमारास घडली. मृतक महिलेचे नाव शारदा महेश मानकर (२५) असून सुरेश मानकर यांची ती सून होती. मृतक महिलेला एक तीन वर्षाचा मुलगा आहे.
माहितीनुसार, सदर महिला हि शेतातील खऱ्यावर कामाकरिता गेली असता जंगला लगत शेत असल्याने जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढवला व तिला ठार केले.
बाजूचा शेतात सुद्धा अनेक महिला काम करीत होत्या पण ही एकटी असल्याची संधी साधून वाघाने गर्भवती महिलेवर हल्ला चढवून तिला ठार केले.
सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आलेली असून वन विभागाची टीम मौजा चातगाव बीट मध्ये दाखल होऊन पंचनामा व पुढील कारवाई करत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे.
सदर प्रकरणाची दखल घेत वन विभागाने मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेने केलेली आहे. या परिसरात वावरत असणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सुद्धा याप्रसंगी नागरिकांनी केलेली आहे.
Gadchiroli: A 25-year-old pregnant woman was killed in a tiger attack.
- The dead body of the woman was taken to District General Hospital Gadchiroli for post-mortem.