दि. 03 मार्च 2025
गडचिरोली : शिवणी गावातील 23 वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : शौचासाठी गेलेली तरुणी बेशुध्दावस्थेत आढळली. तिच्या डोळ्याखाली काळे व्रण असून हाताला दुखापत आहे. जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन तिला अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.तालुक्यातील शिवणी गावात २ मार्चच्या रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
जखमी तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चामोर्शी मार्गावरील वाकडीनजीकच्या शिवणी गावातील २३ वर्षीय तरुणी शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे. २ मार्चला सायंकाळी सहा वाजता ती शौचासाठी गावालगत उघड्यावर गेली होती. तासाभरानंतरही ती परत न आल्याने कुटुंबीयाने शोध घेतला असता शौचास गेलेल्या ठिकाणापासून २० मीटर अंतरावर ती बेशुध्दावस्थेत आढळली. तिच्या हाताला जखम होती. शिवाय डोळ्याखाली दगड किंवा विटाने मारहाण केल्याचे व्रण होते. दरम्यान, ग्रामस्थांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली ठाण्याचे पो.नि. रेवचंद सिंगनजुडे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली.
सदर युवती हि गरीब शेतकरी कुटुंबातील असून ती शारीरिकरित्या अशक्त असल्याची माहिती आहे.या युवतीला रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे गंभीर अस्वस्थेत उपचार करिता दाखल करण्यात आले. या वेळी महिला पोलिसासह काही अधिकारी रुग्णालयात पोहचले होते.
२३ वर्षीय मुलीवर झालेला अत्याचार हा एकेरी नसून सामूहिक असल्याची गावामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
संशयितांची चौकशी सुरु
या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांकडून वेगाने तपास सुरु करण्यात आला आहे. तरुणीवर हल्ला करणारा आरोपी एक की त्याहून जास्त याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. संशयितांकडे कसून चौकशी सुरु आहे. हल्लेखोर गावातीलच असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यादृष्टीने तपासचक्रे गतिमान केली आहेत.
"तरुणीवर हल्ला करणाऱ्याचा शोध सुरु आहे. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला किंवा नाही हे तिच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. तूर्त या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली असून कुठल्याही स्थितीत लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक
Gadchiroli: A 23-year-old girl from Shivani village was physically assaulted.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI