दि. 19 मे 2025
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे हेडरी येथे ग्रामीण मुलांसाठी परिवर्तनात्मक उन्हाळी शिबिर.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली /हेडरी: लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) ने सामुदायिक विकास उपक्रमांतर्गत ८ मे ते १८ मे या कालावधीत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी, हेडरी येथे दहा-दिवसीय उन्हाळी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले. दररोज ५०० हून अधिक मुले ह्या शिबिरात उत्साहाने सहभागी झाली, ज्यात गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांतील मुले देखील समाविष्ट होती.
६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना शारीरिक प्रशिक्षण, सर्जनशील शिक्षण, आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सदर उन्हाळी शिबिराचे नियोजन केले होते. शिबीरादरम्यान मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे ह्यासोबतच त्यांच्यात संघभावना (टीम स्पिरिट) जागृत करणे तसेच त्यांच्या प्रतिभेला उजाळा देणाऱ्या उपक्रमांमध्ये ऍथलेटिक्स, धनुर्विद्या, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, नृत्य, कला आणि हस्तकला, आणि चित्रकला यांचा समावेश होता.
सुदूर आदिवासी भागातून सहभागी झालेल्या ९० मुलांसाठी LIF ने प्रवास, निवास आणि पौष्टिक जेवण इत्यादी सोयीची सहर्ष व्यवस्था केली. उन्हाळी शिबिरातील सर्व सहभागींना क्रीडा पोशाख प्रदान करून त्यांच्यात सांघिक एकता निर्माण करण्यात आली.
शारीरिक कवायतींव्यतिरिक्त शिबिरात पर्यावरण जागरूकता, सुरक्षा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि रोजगार मार्गदर्शन या विषयावर मौल्यवान सत्रे घेण्यात आली. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसोबत संवादात्मक सत्र हे शिबिराचे विशेष आकर्षण होते. ह्या सत्रात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील करिअर संधी, पोलिस विभागाचे कामकाज, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलिस भरती परीक्षांच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करून प्रेरित केले. याव्यतिरिक्त, लॉयड्स मेटल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनी तसेच इतर क्षेत्रांमधील करिअर संधींबद्दल शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी झालेल्या समारोप समारंभात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, स्थानिक नेते, पोलिस अधिकारी आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL), LIF, आणि लॉयड्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड (LICL) मधील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिबिरार्थींच्या प्रभावी कलाकृतींचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या पालकांना अभिमान वाटला आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
पुरसलगोंदी ग्राम पंचायत च्या सरपंच अरुणाताई सडमेक, नागूलवाडी चे सरपंच नेवलुजी गावड़े, नागूलवाडी चे उप-सरपंच राजुभाऊ तिम्मा, तोडसा च्या सरपंच वनिता नरोटी-कोरामी, उडेरा चे सरपंच गणेश गोठा, बुर्गी चे सरपंच विलास गावड़े, बुर्गी चे पोलीस पाटील सौरव कावड़ो, मोहोरली चे पोलीस पाटील कोमती गावड़े, कुदरी चे पोलीस पाटील विजय तिम्मा, नागूलवाडी चे पोलीस पाटील माधव गावड़े, पेठा चे पोलीस पाटील दसाजी कोरामी, एकरा खुर्द चे पोलीस पाटील रामा गोटा, आणि इतर मान्यवरांनी ह्या प्रसंगी विशेष उपस्थिती दर्शविली.
त्यांच्या प्रतिभेची दखल घेत ४७२ मुलांना २.३५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. एकूणच हा कार्यक्रम सगळ्यांसाठी उत्साहवर्धक ठरला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान आणि उपस्थित जनसमुदायाकडून मिळालेला टाळ्यांचा कडकडाट या उपक्रमाचे जबरदस्त यश प्रतिबिंबित करीत होता.
ह्या प्रसंगी बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक तथा लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन चे संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “हे शिबिर केवळ निखळ आनंद आणि खेळांबद्दल नव्हते तर ते स्वप्ने, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया बांधण्याबद्दल होते. मुलांना त्यांच्या आवडी शोधताना आणि नवीन मैत्री निर्माण करताना पाहणे आमच्यासाठीही आनंददायी अनुभव होता.”
उन्हाळी शिबिर-२०२५ हा एक संस्मरणीय, सक्षमीकरण करणारा आणि आनंददायी अनुभव ठरला, ज्यामुळे ग्रामीण मुलांमध्ये महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि नवीन शक्यता अंतर्मनात आकार घेऊ लागल्या. सदर उपक्रम लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या तरुणांना सक्षम बनवण्याच्या आणि तळागाळातील घटकांच्या सहभागाद्वारे नवनवीन संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा पुरावा आहे.
Lloyds Infinite Foundation's transformative summer camp for rural children at Headari.!
#गडचिरोली #gadchiroli #Maharashtra #MediaVNI